Kolhapur Crime : आजीचा खून : शिवाजी पेठेतील मित्राकडून 13.75 लाखांचे दागिने हस्तगत

नातवाला पोलिस कोठडी; वृद्धेचा 20 मिनिटांत तडफडून मृत्यू
Kolhapur Crime  News
Kolhapur Crime NewsPudhari file photo
Published on
Updated on

कोल्हापूर : चहातून विषारी औषध देऊन आजीचा थंड डोक्याने खून करून मृतदेहाच्या अंगावरील तसेच खोलीतील दागिने लुटणाऱ्या संशयिताकडून लक्ष्मीपुरी पोलिसांनी 13 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने शनिवारी हस्तगत केले होते. संशयित प्रेम परशुराम भिऊंगडे (वय 20, रा. ज्ञानसागर रेसिडेन्सी, फुलेवाडी, कोल्हापूर) याने शिवाजी पेठेतील मित्राकडे गुन्ह्यातील दागिने लपविल्याचे उघड झाले. न्यायालयाने संशयिताला सहा दिवसांची पोलिस कोठडी बजावली.

संशयिताने चहातून विष प्यायला दिल्यानंतर काही क्षणात वृद्धा उषा मारुती भिऊंगडे (वय 72, रा. शुक्रतारा अपार्टमेंट, ऋणमुक्तेश्वर मंदिरजवळ, कोल्हापूर) यांना उलट्या सुरू झाल्या. वीस मिनिटांहून अधिक काळ त्या जिवाच्या आकांताने तडफडत होत्या. त्यानंतर बेशुद्ध झाल्या. जोरजोरात उचक्या देत वृद्धेने प्राण सोडला.

वृद्धेची होणारी तडफड संशयित डोळ्याने पाहत होता. हालचाल थंडावल्यानंतर संशयित प्रेम भिऊंगडे याने मृतदेहाच्या अंगावरील, कपाटातील सोन्याच्या सहा पाटल्या, दोन सोनसाखळ्या, कर्णफुले असा 12 तोळ्याचे दागिने लंपास करून बंगल्यातून धूम ठोकल्याचेही पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण, लक्ष्मीपुरी पोलिसांनी वृद्धेच्या खुनाचा छडा लावून नातू प्रेम भिऊंगडेला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी संशयिताला शनिवारी सायंकाळी ऋणमुक्तेश्वर मंदिरजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमधील घटनास्थळी फिरविले. खोलीतील घटनाक्रमाची त्याने पोलिसांना माहिती दिली. आजीचा अत्यंत क्रूरपद्धतीने खून करून लुटलेले सोन्याचे दागिने संशयिताने शिवाजी पेठ येथील मित्राकडे ठेवले होते. संशयित सुवर्ण कारागीर असल्याने मित्राने चौकशी न करता हे स्वत:जवळ ठेवून घेतल्याची कबुली दिली. संबंधित दागिने ताब्यात घेण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत सहभाग निष्पन्न झाल्यास संबंधिताला अटक करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

चार दिवसांपूर्वी वृद्धेच्या खुनासह दागिने लुटण्याचा कट

संशयित प्रेम हा शिवाजी पेठेतील एका कॉलेजमध्ये द्वितीय वर्गात शिक्षण घेत आहे. चैनीसाठी लागणाऱ्या पैशासाठी त्याने वृद्धेचा खून करून सोन्याचे दागिने व रोकड लुटण्याचा कट चार दिवसांपूर्वी रचला होता. त्यानंतर दोन ते तीन वेळा त्याने प्लॅटमध्ये जाऊन वृद्धेच्या भेटीचा फार्स करून प्लॅन केला होता, अशीही माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे. चहातून विष दिल्यास खुनाचा उलगडा होणार नाही, असा त्याचा कट होता. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news