

नागाव : हातकणंगले तालुक्यातील तासगाव-संभापूर रोडवरील अव्हेन्यू लॉजिंगच्या पार्किंगमध्ये हातात लोखंडी खंजीर घेऊन नाचत दहशत माजविणाऱ्या चार युवकांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी त्याना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडील लोखंडी खंजीर जप्त केले असून त्याना वडगांव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ४ जून रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारास तासगाव-संभापूर रोडवरील अव्हेन्यू लॉजिंगच्या पार्किंग परिसरात चार तरुण संशयास्पदरीत्या आले. त्यांच्या हातात घातक लोखंडी खंजीरसारखे हत्यार होते. हे हत्यार हवेत नाचवून ते परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत माजवत होते. हा प्रकार लक्षात येताच लॉजिंग येथील शिरीष राजाराम कोळी (वय ३६, रा. गणपती मंदिरजवळ, शिरोली पुलाची) यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आले आणि दहशत माजवणाऱ्या प्रेम दिलीप कांबळे (वय २१, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) , ओंकार विनायक पाटील (वय २१, रा. नागाव पलुस ) , स्वप्निल सदाशिव जाधव (वय २४, रा. अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली) , कैलास संतोष वासुदेव (वय १९, रा. भिलवडी माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली) या चौघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी खंजीर हस्तगत करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. लॉजिंगचे शिरीष कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.