Kolhapur Crime : कॅन्सरवरील औषधाच्या बहाण्याने भोंदूचा विवाहितेवर बलात्कार

संशयित प्रतीक मुळे फरार : गुन्हा दाखल ; शोधासाठी पोलिस पथके रवाना
Kolhapur Crime News
कॅन्सरवरील औषधाच्या बहाण्याने भोंदूचा विवाहितेवर बलात्कार
Published on
Updated on

कोल्हापूर : कॅन्सरवर औषध देण्याच्या बहाण्याने कळंबा तलाव परिसरातील एका लॉजवर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी कथित भोंदूबाबा प्रतीक मुळे याच्याविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेची वाच्यता केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकीही संशयिताने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सोमवारी (दि. 16) दुपारी 3.30 ते सायंकाळी 5 या वेळेत हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. भोंदूबाबाने महिलेसह कुटुंबीयांच्या असहायतेचा गैरफायदा घेत पीडितेवर अत्याचार केल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली असून संशयिताला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. पीडित महिला पती व दोन मुलांसह भाड्याच्या खोलीत राहते. उदरनिर्वाहासाठी धुण्या-भांड्याचेही काम करते. लक्ष्मीपुरी येथील मटण मार्केट परिसरातील धार्मिक स्थळावर कुटुंबाची श्रद्धा असल्याने त्यांचा नेहमी वावर असतो. याठिकाणी संशयित प्रतीक मुळे याचा सतत वावर असतो. त्यामुळे त्याची ओळख झाली आहे. पीडित महिलेच्या बहिणीला कॅन्सर झाल्याने भोंदूबाबाने त्यावरील औषध देण्याचा बहाणा केला. 16 फेबुवारीला पती दोन दिवस परगावी गेल्याने त्याचा फायदा घेत भोंदूने महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. कॅन्सरचे औषष देतो, असे सांगून महिलेला त्याने शिवाजी पेठेत बोलावून घेतले.

लॉजवर जबरदस्तीने बलात्कार; जीवे मारण्याची धमकीही

लाल रंगाच्या मोटारीतून महिलेला कळंबा तलावाच्या दिशेने नेले व परिसरातील लॉजसमोर मोटार थांबविली. लॉजमधील खोलीत नेल्यानंतर त्याने खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच भोंदूने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. या घटनेने भेदरलेल्या महिलेने पती परगावाहून येताच त्यांना हा प्रकार सांगितले.\

हद्दीच्या वादात महिलेसह कुटुंबीयांची फरफट

महिलेसह कुटुंबीयांनी सकाळी करवीर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुरू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली.

पोलिसांची पथके रवाना

पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी रात्री उशिरा घटनेची माहिती दिली. संशयित भोंदूला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यास अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news