

यड्राव : घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेर गेलेल्या वृद्धाच्या घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर चोरट्याने डल्ला मारला. कोरोची (ता. हातकणंगले) येथील विवेकानंदनगर परिसरात ही घटना घडली.
घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत बेडरूममधील तिजोरीचे लॉकर उचकटून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख २५ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत हरिभाऊ गणपती जाधव (वय ६१, रा. चिंतामणी गणेश मंदिरामागे, कोरोची) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१५ ते १६ नोव्हेंबरच्या दरम्यान ही चोरी झाली. जाधव हे कुटुंबीयांसह मूळ गावी कुची (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे वारकर्यांना चहा-नाश्ता देण्यासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत तिजोरीतील ३० ग्रॅमचे सोन्याचे पट्टी गंठण, १० ग्रॅमची अंगठी, अडीच ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमचे झुबे, चांदीचा छल्ला, दोन चांदीच्या बांगड्या, दोन जोडवी तसेच १८ हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.