

नागाव: पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणास ताब्यात घेत त्याच्याकडून ४ किलो गांजा, दुचाकी, मोबाईल असा दिड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुलाची शिरोली येथील पाण्याच्या टाकीजवळ बुधवारी (दि.११) रात्री करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून आठ दिवसात दुसर्यांदा कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमरअली इस्माईल पटेल (वय ३१, रा. पुलाची शिरोली ) असे आहे. बुधवारी रात्री शिरोली येथील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती मोटार सायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार खातरजमा करून पोलिसांनी पुणे-बेंगरूळ राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. उमरअली पटेल तिथे येताच पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ०४ किलो १२० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी तातडीने गांजासह त्याची दुचाकी आणि मोबाईल असा १ लाख ५४ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत अधिक चौकशी केली.
शिरोली एमआयडीसी परिसरात चोरून गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे हि कारवाई ही कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेश कुमार साो, मा. अप्परपोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजितकुमार शिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार सचिन जाधव, अनिकेत जाधव अशोक पोवार, महेश आंबी, विनायक चौगुले, सदिप पाटील,वसंत पिंगळे, राजू येडगे, सुशिल पाटील, अरुण धनगर यांनी केली आहे.
शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे स्थानिक शिरोली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता जनसामान्यातून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्याना जे दिसते, ते हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरोली पोलिसांना का दिसत नाही स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसाना आपल्या हद्दीत अवैध प्रकार सुरू असताना त्यांना याची खबर कशी लागत नाही? हे त्यांचे अपयश आहे की जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत .