

कोल्हापूर : कदमवाडी तळी मैदान येथे क्रिकेट मॅच पाहण्यावरून पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी एडका, फायटरने केलेल्या हल्ल्यात दोघे सख्खे भाऊ जखमी झाले. ओम अजित लोखंडे (वय 23), केदार अजित लोखंडे (20, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शिवाजी पार्क) अशी जखमींची नावे आहेत. जखमी ओम याने याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलेश किसन आकाडे, मिलिंद किसन आकाडे, सूरज उमेश कांबळे, सौरभ हणमंत नागटिळे, प्रीतम सुखदेव बरडे, सोन्या ऊर्फ अनिल माने (सर्व रा. शाहू कॉलेज समोर, विचारे माळ) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.
नीलेश आकाडे व ओम लोखंडे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सरू आहे. शनिवारी (दि.24) रात्री ओम व केदार हे कदमवाडी येथील तळी मैदान येथे क्रिकेट मॅच पाहण्यासाठी गेले होते. यावेळी नीलेश आकाडे याने ओम व केदारला तू मॅच बघायची नाहीस, असे म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नीलेशसोबत असणाऱ्या त्याच्या साथीदारांनीही केदार व ओम यांना मारहाण केली. दरम्यान, नीलेश याने ओमच्या डोक्यात व डाव्या पायावर एडक्याने हल्ला केला. केदारच्या तोंडावर लोखंडी फायटर मारले. यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. मारहाणीत जखमी झाल्याने ओम व केदार यांना सीपीआरमध्ये दाखल केले. ओम याने झालेल्या मारहाणीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा संशयितांवर गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.