

दिलीप भिसे
कोल्हापूर : मुंबई, पुण्यासह बड्या शहरांत बोकाळलेली कॅफे पॉईंटसह निर्जन माळावरची लॉज संस्कृती कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात फोफावू लागली आहे. अलीकडच्या काळात शहरातील मध्यवर्ती चौकांत, उपनगरांमध्येही कॅफेच्या नावाखाली अंधाऱ्या खोलीत इश्काचे अड्डे बिनदिक्कत सुरू आहेत. बहुचर्चित ठरणाऱ्या कॅफेतील मंद दिव्याच्या अरुंद खोलीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असहाय युवतींसह महिला वासनेच्या शिकार ठरत आहेत. शहर, जिल्ह्यात इष्काचा खुल्लमखुल्ला बाजार मांडला जात असतानाही पोलिस दलांतर्गत विविध घटकांची बघ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
‘लव्ह जिहाद’मुळे महाराष्ट्रात खळबळ
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील ‘लव्ह जिहाद’चा भांडाफोड झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात या प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. 2022 पासून आजअखेर म्हणजे एप्रिल 2026 पर्यंत जिल्ह्यात हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. बापजाद्यांनी कमावलेल्या संपत्तीच्या राशीवर आणि सडक सख्याहरींच्या तालावर किळसवाणा आणि संतापजनक प्रकार सुरू आहे.
शहरासह ग््राामीण भागात; किंबहुना महामार्गांवर आडोशाला दुकानदारी थाटलेल्या कॅफे पॉईंटसह निर्जन, मोकळ्या माळरानावर खुल्लमखुल्ला लॉज संस्कृतीमुळे अलीकडच्या काळात हे प्रकार वाढीला लागले आहेत. कॅफे म्हणजे तरी काय? मिटिंग पॉईंटच, असेच त्याचे गोंडस नाव. अत्यंत अरुंद केबिन, कमीत कमी जागेवर टेबलावर केवळ दोन व्यक्तींच्या बैठकीची व्यवस्था... मंद प्रकाश... सभोवताली गडद रंगाचा काळा पडदा... तासाला हजारापासून अडीच हजारांपर्यंतचे भाडे... त्यात पेग... नाश्त्यासह मागेल ती सुविधा... पूर्ण एकांतवास... बुकिंगसाठी ॲडव्हान्स नोंदणीची सक्ती... ना ओळखपत्र, ना रजिस्टर नोंदणी... सीसीटीव्हीचा तर पत्ताच नसतो... मनसोक्त एन्जॉय... पोलिसांची फिरती असते; पण कॅफेच्या बाहेरच... त्यांना म्हणे अंदर जाना मना है... ही झाली कोल्हापूरसह जिल्ह्यातील कॅफे पॉईंटची अवस्था.
सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गर्दी
लोकवस्ती, पर्यटकांचा पत्ता नसलेल्या निर्जन, ओसाड माळरानावर शेकड्याने लॉजेस सुरू झाले आहेत. काही लॉजेसचा तर पोलिसांनाही पत्ता नाही. लोकवस्तीपासून अडीच कोस दूर असलेल्या लॉजेसवर सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वर्दळ चालू असते. कोणीही यावे आणि तास, दोन तास इश्काचा डाव खेळून जावे, अशीच काहीशी स्थिती आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे गुरुवारी जुना बुधवार पेठेतील नराधमाने शहरातील मध्यवर्ती महाद्वार रोडवरील हँग ओव्हर कॅफेसह कात्यायनी परिसरातील व्हाईट हाऊस, कळंबा येथील सारथी लॉजवर इष्काचा डाव खेळल्याचे जुना राजवाडा पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.
पोलिस बघ्याच्या भूमिकेत
शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्यासह करवीर, इस्पुर्ली, कागल, मुरगूड, शिरोली, गोकुळ शिरगाव, हातकणंगले, वडगाव, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील कॅफे पॉईंटसह लॉजेसमध्ये चालणारे फंडे प्रभारी अधिकाऱ्यांना तरी माहीत आहेत का, हा सामान्यांचा सवाल आहे. वास्तविक, पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लॉजेस तपासणीचे अधिकार आहेत. त्यांनी किती लॉजेसची तपासणी करून गैरप्रकार चालणाऱ्या किती फर्मवर कायद्याचा बडगा उगारला, हा संशोधनाचा विषय आहे.