

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर अपघातांची वाढती संख्या, कोल्हापूर-सांगली रस्ता आशिया खंडात अपघातांसाठी कुप्रसिद्ध, त्याशिवाय कोकणातील घाटरस्ते व लगतच्या सीमाभागात होणार्या अपघातातील जखमींचा ताण हा नेहमीच छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलवर असतो. पूर्वीची अपघात विभागाची अवस्था पाहिली की अक्षरश: अंगावर काटा यायचा. पण आता पूर्ण वातानुकूलित 30 बेडस्चा जो अत्याधुनिक अपघात विभाग सुरू करण्यात आला आहे, तेथील सुविधा या महानगरातील हॉस्पिटलच्या तुलनेत तसूभरही कमी नाहीत. पुढील काही वर्षांच्या सुविधांचा आढावा घेऊन हा विभाग सुसज्ज करण्यात आला आहे.
पूर्वीच्या हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात अपघात विभाग होता. विभाग कसला तर येथे अपघातग्रस्त रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना विभागात उपचारासाठी हलविले जात होते. मात्र आता वातानुकूलित विभागात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या मॉड्युलर अपघात विभागात 30 बेडस् आहेत. प्रत्येक बेडला मल्टीपॅरा मॉनिटर, व्हेंटीलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, सेट्रल सक्शन यांसारख्या अत्याधुनिक सुविध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बेडबरोबर असणार्या या सुविधा व 24 तास लक्ष ठेवणारा प्रशिक्षित स्टाफमुळे प्रत्येक अपघातग्रस्त रुग्णावर वैयक्तिक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
यापूर्वी हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी थांबावे लागत असे. त्याची यंत्रणाही तोकडी व दिवसाच डायलिसिस करण्याची सुविधा होती. मात्र आता 15 बेडस्चा अत्याधुनिक डाललिसिस विभाग सुरू करण्यात आला असून तो 24 तास सुरू राहणार आहे. यामुळे आता वाट पाहावी लागणार नाही. त्याचप्रमाणे दूधगंगा इमारतीत तळमजल्यावर 15 बेडस्चा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. बेडस्ची संख्या वाढविल्यामुळे व प्रत्येक बेडला स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक बेडसाठी मल्टीपॅरा मॉनिटर, व्हेंटीलेटर, सेंट्रल सक्शन व ऑक्सिजन या सुविधा आहेत.
एक्स रे विभागालाही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी पूर्वीच्या तुलनेत फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. निर्जंतुकीकरण विभागाचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी 30 बेडस्चा शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. फिजिओथेरपीच्या अत्याधुनिक सुविधा असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना आवश्यक असणार्या सर्व सुविधा त्यांच्या कक्षातच उपलब्ध करून दणार असून त्यांना कोणत्याही सेवेसाठी केसपेपर घेऊन फिरावे लागणार नाही.
यापूर्वी रुग्ण ज्या वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल आहेत, त्याच परिसरात व्हरांड्यात आणि जिन्यावर रुग्णांचे नातेवाईक राहात होते. सामान्य कुटुंबातील माणसाला हॉटेलमध्ये राहणे परवडत नाही. मात्र ते व्हरांड्यात राहिल्याने गैरसोय होत होती. याची दखल घेऊन रुग्ण दाखल असलेल्या सोळा इमारतीच्या टेरेसवर रुग्णांच्या नातेवाईकांना निवारा शेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातून 4 लाख चौरस फूट जागा उपलब्ध झाली आहे.