

कोल्हापूर : सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील कॅथलॅब उपकरण बंद होते. त्यामुळे हृदय शस्त्रक्रिया विभागातील शस्त्रक्रिया दोन दिवस बंद होत्या. 9 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी वेटिंगवर होते. दै. ‘पुढारी’मध्ये गुरुवारी ‘सीपीआरचे हृदय बंद, रुग्णांची धडधड वाढली’ असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने गतीने या उपकरणाची दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे या विभागातील शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. वेटिंगवर असणार्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.
गोरगरिबांसाठी सीपीआरचा हृदय शस्त्रक्रिया विभाग आधारवड आहे. या विभागाचे नूतनीकरण करण्यात आले असून, या विभागाच्या अंतरंगासह बाह्यरंग खुलले आहे. मात्र, विभागातील अनेक उपकरणे जुनीच आहेत. यामधील काही उपकरणे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ती केव्हाही बंद पडतात. त्यामुळे येथील डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाच्या हृदयचे ठोके वाढतात. एखादे उपकरण बंद पडले की, एन्जिओग्राफी, एन्लिओप्लास्टीसह हृदयासंबंधीच्या सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवाव्या लागतात. अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे हृदय शस्त्रक्रिया विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासह सीमे लगतच्या जिल्ह्यात आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे या विभागात उपचार घेणार्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. ज्या रुग्णांच्या हृदयामध्ये दोष आढळतो. त्यांना पुढील उपचारासाठी येथे दाखल करून घेतले जाते. महिन्याला सुमारे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी प्रत्येकी 70 आणि छोट्या - मोठ्या 10 ते 15 शस्त्रक्रिया येथे होतात. मात्र, हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे कॅथलॅब उपकरण मंगळवार व बुधवार असे दोन दिवस बंद राहिल्याने रुग्णांच्या हृदयाची धडधड वाढली होती. गुरुवारी सीपीआर प्रशासनाने तत्काळ संबंधित इंजिनिअर यांना बोलावून घेऊन उकरणांची दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे वेटिंगवर असणार्या शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 10 रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी दिली.