

कोल्हापूर ः महापालिकेचा कोणता अधिकारी किती पैसे खोतो... त्याची माझ्याकडे नावानिशी यादी आहे. चौकशी लावली तर तुम्हाला जड जाईल, असा इशारा देत महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाला सुरळीत कामे करा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम बुधवारी (दि. 18) महासभेतच दिला. आयुक्त के. मंजुलक्ष्मी प्रमुख उपस्थित होत्या.
प्रशासनाकडून विविध विभागांच्या करवाढीचे प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी होते. मात्र, सभागृहाने करवाढीचे सर्व प्रस्ताव नामंजूर केले. यावेळी नगरसेवकांनी परवाना, पाणीपुरवठा, घरफाळा विभागांचे वाभाडे काढले. दरम्यान, नगरसेविका जयश्री चव्हाण यांच्या स्ट्रीट लाईटसंदर्भातील प्रश्नावर महापौर निकम यांनी संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्याचे सांगितले.
तोडपाणीसाठी घरफाळ्याची वाढीव बिले
शारंगधर देशमुख यांनी उपनगरात अनेक मिळकतधारकांना घरात भाडेकरू नसतानाही गेल्या सात वर्षांचे दंडासह बिल आल्याचे सांगून तोडपाणी करण्यासाठी बिले पाठविल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर केला. अर्जुन माने यांनीही नागाळा पार्कातील मिळकतधारकांना अशीच बिले आल्याचे सांगितले. स्थायी सभापती विशाल शिराळे यांनी नव्याने मिळकतींचा सर्व्हे करावा, अशी सूचना केली.
बांगला देशींना रोखण्याची जबाबदारी
राज्यात 75 हजार बांगला देशींनी मतदान केल्याचे सांगून महापौर निकम यांनी नव्याने होणाऱ्या मतदार याद्यांत नगरसेवकांनी सजग राहावे. बांगला देशी घुसखोरांना शोधण्यासाठी मदत करावी, असे आवाहन नगरसेवकांना केले.