

कोल्हापूर ः राज्यात नांदेड, नागपूर, धाराशिव येथे आढळलेल्या बनावट औषधांच्या साठ्यामागे कोल्हापूर कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. कोल्हापुरातील विशाल एन्टरप्रायझेस कंपनीकडून हा औषध पुरवठा करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचे पती यामध्ये आहेत. या कंपनीशी संबंधित एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बनावट औषधे आढळल्यानंतर राज्यात कारवाई गतिमान झाली. यामध्ये धाराशिव, नांदेड, आंबेजोगाई, वर्धा, भिवंडीतही अशा प्रकारे बनावट औषध पुरवठा झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व ठिकाणी कोल्हापुरातील विशाल एन्टरप्राईजेस कंपनीमार्फत औषधाचा पुरवठा केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
विशाल एन्टरप्राइजेस कंपनीचे मालक सुरेश पाटील यांच्यावर राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत बनावट औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, बनावट औषध पुरवठा प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा विशाल एन्टरप्राईजेकडून करण्यात आला आहे. एका डिस्ट्रिब्युटरकडून औषधे खरेदी करून मागणी केलेल्या राज्यातील चार रुग्णालयांना दिली. या प्रकरणात बनावट औषध पुरवठा करून विशाल एन्टरप्राईजची फसवणूक केल्याची माहिती विशाल एन्टरप्राईजेसने दिली आहे.