

कोल्हापूर : कॅन्सरसद़ृश गाठीसह जबडाच काढून त्याजागी पायाचे हाड बसवत महिलेचा चेहरा पूर्ववत करण्यात आला. सीपीआरच्या दंतशल्य चिकित्साशास्त्र विभागात अशा प्रकारची पहिलीच अतिशय गुंतागुंतीची मायक्रोव्हॅस्कूलर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
धामोड (ता. राधानगरी) येथील दैवता तिबिले (वय 25) यांची तीन वर्षांपूर्वी जबड्यातील गाठ खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे गाठली होती. तशीच गाठ पुन्हा उद्भवली. मात्र, पूर्वीपेक्षा या गाठीचे आकारमान मोठे असल्याने सीपीआरमध्ये 21 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या या महिलेचा 23 ऑगस्ट रोजी गाठीसह जबडाच काढून टाकण्यात आला. पायाचे हाड काढून त्याला जबड्याचे स्वरूप देण्यात आले. पायाच्या हाडांपासून केलेल्या या जबड्याच्या सर्व नसांना, अन्य सर्व नसा जोडून पूर्वीप्रमाणे रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. सीपीआरमध्ये ती महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी सांगितले.
दंतशास्त्र विभागाचे डॉ. अमोल लाहोटी, डॉ. गायत्री कुलकर्णी व डॉ. प्रियांका सावडकर, डॉ. नितीन जैसवाल, डॉ. प्राची पन्हाळे यांनी जबडा काढून टाकण्याची तर डॉ. वसंत देशमुख व डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक सर्जन डॉ. प्रशांत चौधरी, त्यांचे सहकारी डॉ. तन्मय अग्रवाल, डॉ. त्यागराज, डॉ. नेहा यांनी पायाचे हाडापासून जबडा करून तो बसविण्याची मायक्रोव्हॅस्कूलर शस्त्रक्रिया केली. डॉ. उल्हास मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्योती नैताम व त्यांच्या सहकार्यांनी भुलीसाठी तसेच इएनटी विभागातील परिचारिका व कर्मचार्यांचे विशेष सहकार्य मिळाले. जबड्याशी निगडित सर्व शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये योजनेंतर्गत मोफत होतात. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. लोकरे यांनी केले.
जबडा काढल्यानंतर चेहर्याचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी तब्बल 12 तास अथक परिश्रम घेऊन पायाच्या हाडापासून जबडा करून तो बसविण्याची अतिशय गुंतागुतीची मायक्रोव्हॅस्कूलर शस्त्रक्रिया करण्यात आली.