कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती यांनी संस्थानच्या खर्चातून कोल्हापूरला रेल्वे आणली; मात्र आजच्या खासदार, मंत्री, आमदारांचे रेल्वेच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोल्हापूरची रेल्वे म्हणजे ‘नेत्यांची सोय व जनतेची गैरसोय’ अशीच अवस्था आहे.
मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसचे तिकीट मिळविणे हे अक्षरश: दिव्य आहे. मुंबईला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस लॉकडाऊन काळात बंद झाली. नंतर ती पुण्यापर्यंत सुरू करण्यात आली. ही एक्स्प्रेस मुंबईपर्यंत न्यावी, या मागणीकडे लक्ष द्यावे, असे लोकप्रतिनिधींना का वाटत नाही? कोल्हापूर-मिरज पॅसेंजरमधून प्रवाशांना अक्षरशः जनावरासारखे स्वत:ला कोंबून घेत प्रवास करावा लागतो, हे कधीतरी लोकप्रतिनिधी पाहणार की नाही, असा संतप्त सवाल प्रवाशांतून होत आहे. कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसचे तिकीट मिळविणे कठीणच आहे. खासदार, आमदार, मंत्र्यांनी आपल्या कार्यालयाकडे किती लोक दररोज पत्रे मागण्यासाठी येतात, ते पाहिले तरी ही समस्या त्यांना समजेल. मुंबईला जाणारी दुसरी एक्स्प्रेस कोयना आहे; मात्र ती दिवसा धावते. महालक्ष्मीनंतर मुंबईला जाण्यासाठी सह्याद्री एक्स्प्रेस होती. ती लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आली. रात्री धावणार्या या एक्स्प्रेसला जनतेतून चांगली मागणी आहे. आता ती पुण्यापर्यंत धावते. ती मुंबईला पूर्ववत न्यावी, या मागणीकडे दुर्लक्ष का? खासदार, आमदार, मंत्र्यांना सुविधा आहे. ती असलीच पाहिजे; मात्र जनतेने काय करायचे, याचेही उत्तर लोकप्रतिनिधींनी दिले पाहिजे.
कोल्हापूर-बंगळूर ही राणी चन्नम्मा एक्स्प्रेस मिरजेहून धावत होती, ती सदाशिवराव मंडलिक यांनी कोल्हापुरातून सोडण्यास भाग पाडले; मात्र ती एक्स्प्रेस आता परत एकदा कोल्हापूरऐवजी मिरजेतून सोडण्यात येत आहे. बंगळूरला जाणार्या प्रवाशांना मिरजेला जावे लागते ती कोल्हापुरातून का बंद झाली? याचे उत्तर कोणी द्यायचे? कोल्हापूर-मिरज पॅसेंजर म्हणजे अक्षरश: कोंबडीच्या खुराड्यसारखी झाली आहे. चाकरमानी आणि विद्यार्थी यातून प्रामुख्याने प्रवास करतात. या पॅसेंजरमध्ये प्रत्येक बोगीत जागेवरून होणारी भांडणे ही दररोजची आहेत. या प्रवाशांना तर कोणी वालीच नाही. ना रेल्वेच्या अधिकार्यांना चिंता, ना लोकप्रतिनिधींना जनतेची फिकीर अशीच या पॅसेंजरच्या प्रवाशांची अवस्था आहे.
कोल्हापूूर-सोलापूर रेल्वे बंद झाली. त्यामुळे पंढरपूर आणि तुळजापूरला जाणार्या भाविकांची गैरसोय झाली. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. रेल्वेला चांगले उत्पन्न देणारी ही रेल्वे कोणी बंद केली? याचा जाब कोण विचारणार? कोल्हापूर-तिरुपती व कोल्हापूर-पुणे वंदे भारत या दोन नव्या ट्रेनखेरीज कोल्हापूरला गेल्या 25 वर्षांत काही मिळाले नाही. उलट आहे त्या सुविधा कमी झाल्या.
रेल्वेने पश्चिम महाराष्ट्रातील काही मार्ग धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे तर काही ठिकाणी स्टॉप रद्द करणे, नव्या रेल्वे मार्गाखालील भूमिगत पूल गैरसोयीचे असणे अशा अनेक समस्या आहेत. या गाड्या सुरू करण्यास अनेक कारणे सांगितली जातात. यावर आता पश्चिम महाराष्ट्रातील खासदार अधिवेशनात आक्रमक झाल्याचे दिसतील असे खासदार धैर्यशिल माने म्हणाले.
आपण रेल्वेच्या संसदीय समितीवर असून प्रवाशांच्या गैरसोयी, मालवाहतुकीतील अडचणी यासह रेल्वेच्या सर्व समस्यांवर आपण या समितीत आढावा घेऊ. काही उपाय योजना केल्या आहेत. कोल्हापूरसह अन्य स्थानकांची सुधारणा होत आहे. मात्र प्रवाशांच्या अडचणी आहेत आणि त्या सोडविल्या पाहिजेत त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात खासदार शाहू महाराज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘डेक्कन ओडीसी’ ही पॅलेस ऑन व्हिल्स असा गौरव लाभलेली स्पेशल ट्रेन कोल्हापुरात येत होती. राज्यभर आठवडाभर फिरणार्या या ट्रेनमधून जरभरातून येणारी पर्यटक असत. त्यांनी शेरे पुस्तकात कोल्हापुरात पाहण्यासारखे खूप आहे. त्यामुळे दोन दिवस ही ट्रेन कोल्हापुरात थांबवावी, अशी मागणी नोंदविली आहे; मात्र आहे ती ट्रेनही बंद झाली. यानिमित्ताने जगभरचे प्रवासी कोल्हापुरात येत होते. त्यालाही खीळ बसली; पण त्याचे कोणालाही देणेघेणे नाही. लोकप्रतिनिधी उदासिनता कधी झटकणार?
गेल्या काही दिवसांत देशातील आणि राज्यातील अनेक मंत्री कोल्हापुरात आले. अंबाबाईच्या दर्शनासाठी हे मंत्री थेट स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी दाखल झाले. तेथे त्यांचे सत्कार झाले; मात्र जनतेच्या प्रश्नावर बैठका झाल्याच नाहीत. केवळ आपल्या घरच्या भेटीचे फोटो झळकाविण्यातच लोकप्रतिनिधींनी समाधान मानले आणि जनतेचे प्रश्न मात्र आहे तेथेच राहिले. नितीन गडकरी यांनी याला छेद दिला. लोकप्रतिनिधींच्या घरी भेटीही दिल्या व जनतेच्या प्रश्नावर बैठका घेऊन निर्णयही जाहीर केले.