Kolhapur Crime : पूर्ववैमनस्यातून निर्माण चौकात राडा

तरुणावर प्राणघातक हल्ल्यानंतर दगडफेक; १० वाहनांची तोडफोड
Kolhapur Crime News
पूर्ववैमनस्यातून निर्माण चौकात राडा
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून सोमवारी (दि. १६) सायंकाळी वैभव विष्णू कांबळे याच्यावर एडक्याने प्राणघातक हल्ला केला. याचा बदला घेण्यासाठी १० ते १२ जणांच्या टोळक्याने रात्री उशिरा निर्माण चौक येथील मैलखड्डा येथे संशयिताच्या घरासह परिसरातील १० वाहनांवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेमुळे निर्माण चौकासह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.

पाठलाग करून चाकूहल्ला

जखमी वैभव विष्णू कांबळे (वय १९, रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी निखिल सुतार, साहिल सतीश कांबळेसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला. वैभव कांबळे व संशयित हे मित्र होते. २०२४ मध्ये वैभव व साहिल कांबळे यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. याचाच राग मनात धरून सोमवारी रात्री निखिल, साहिलसह इतर चौघांनी दुचाकीवरून वैभवचा पाठलाग करून जुना वाशी नाका परिसरात गाठले. त्याला शिवीगाळ करत लाथा-बुक्‍क्यांनी मारहाण केली. दरम्यान, साहिलने वैभवच्या डोक्यात एडक्याने हल्ला केला.

दुसरीकडे, अजय शशिकांत सुतार (२५, रा. मैलखड्डा, निर्माण चौक) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य गुरवसह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्‍यात आला. चाकूहल्ल्याचा राग मनात धरून रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आदित्य गुरवसह साथीदारांनी मैलखड्डा परिसरात काठ्या, तलवारींनी दहशत माजवण्यास सुरुवात केली. जमावाने संशयित निखिल सुतारच्या घरावर दगडफेक करत परिसरातील ४ दुचाकी, ५ चारचाकी आणि एका रिक्षावरही दगडफेक केल्याने १० वाहनांचे नुकसान झाले. सुमारे १५ मिनिटे हा तोडफोडीचा प्रकार सुरू होता. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. घटनास्थळी काचांचा आणि चपलांचा खच पडला होता.

संशयितांची धरपकड

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रीच संशयितांची धरपकड सुरू केली. मंगळवारी (दि. १७) रात्री उशिरापर्यंत दोनही गटांच्या ५ जणांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.