

कोल्हापूर : शासकीय कर्मचार्यांच्या वैद्यकीय बिलांच्या फायलींच्या मंजुरीसाठी झालेल्या देवाणघेवाणीचा हिशेब ठेवलेल्या ‘लाल डायरी’मुळे दोन व गंभीर स्वरूपाच्या विविध तक्रारी एका अधिकार्याच्या अंगलट आल्या. त्यामुळे दोन प्रकरणांत एकाच दिवशी एकाचवेळी आरोग्य विभागातील तीन वरिष्ठ अधिकार्यांचे निलंबन झाले आहे.
कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, तत्कालीन माजी जिल्हा शल्य चिकित्सक व सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. सुप्रिया देशमुख आणि गंभीर तक्रारीमुळे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीएओ) नामदेव मोरे यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिये यांनी ही कारवाई केली.
सोयीची भूमिका नडली : वैद्यकीय बिलांच्या हिशेबाच्या ‘लाल डायरी’च्या चौकशीसाठी समिती स्थापून अहवाल तयार केला. यामध्ये वैद्यकीय बिलांच्या फाईल्सबाबत कुठेही आवक-जावक नोंदी नियमित नव्हत्या. प्रशासकीय कार्यपद्धती अवलंबली नव्हती. गैरकारभाराला सोयीची अशी कामाची पद्धत राबविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.