

कोल्हापूर : पुणे-मुंबईसारख्या वैद्यकीय सुविधा कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक आणि कोकणातील रुग्ण उपचारासाठी येथे येतात. परिणामी कोल्हापूर मेडिकल हब म्हणून नावारूपास आले आहे. दुसरीकडे मात्र सरकारी हॉस्पिटलची दुरवस्था दिसत आहे. त्यात महापालिकेच्या हॉस्पिटलची तर अवस्था दयनीय आहे. महापालिकेत गेली 15 वर्षे चक्क आरोग्यधिकारी पदच रिक्त आहे. त्यावरूनच प्रशासनाला जनतेची किती काळजी आहे हे स्पष्ट होते.
गोरगरीब जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा अल्प दरामध्ये मिळाव्यात यासाठी महापालिकेने 15 ऑगस्ट 1951 रोजी स्वनिधीतून सावित्रीबाई फुले हॉस्पिटल बांधले. दर्जेदार चांगल्या सुविधामुळे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी होऊ लागली. महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत फुले हॉस्पिटल हे प्रमुख. त्यावरच महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा डोलारा अवलंबून. मात्र गेल्या काही वर्षांत सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच आयसीयूमध्ये असल्यासारखी स्थिती झाली आहे. एकेकाळी रुग्णसेवेत सुवर्णकाळ अनुभवलेल्या या हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांची आणि डॉक्टरांचीही वानवा आहे. गोरगरिबांच्या महिलांची कमी खर्चात प्रसूती व्हावी या हेतूने 26 जानेवारी 1981 रोेजी महापालिकेने पंचगंगा रुग्णालयाची स्थापना केली. सुरुवातीच्या कालावधीत रुग्णालयात सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. मात्र काळानुसार रुग्णालयात बदल झाले नाहीत. आता तर प्रसूतीसाठी महिला येतात. पण तज्ज्ञांअभावी त्यांना इतरत्र जावे लागत आहे. आयसोलेशन हॉस्पिटल येथे उपचारासाठी नवीन इमारत बांधण्यात आली. परंतु ती इमारत आता रिकामी पडली आहे. (उत्तरार्ध)
महापालिकेची प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे
सावित्रीबाई फुले रुग्णालय फिरंगाई रुग्णालय राजारामपुरी सदर बाजार श्री पंचगंगा रुग्णालय कसबा बावडा फुलेवाडी महाडिक माळ आयसोलेशन हॉस्पिटल सिद्धार्थनगर मोरे-मानेनगर
वर्षभरातील औषधांसाठी फक्त एक कोटी
महापालिकेचे महसुली बजेट तब्बल 600 कोटींच्या जवळपास आहे. आरोग्य विभागावर 15 कोटी 81 लाख वर्षाला खर्च होते. त्यापैकी तब्बल 13 कोटी 12 लाख रुपये सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील वेतन भत्त्यावर खर्च होते. औषधांसाठी फक्त एक कोटी रुपये बजेट आहे. उर्वरित रक्कम कॉट-गाद्या घेणे, पेशंटना अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, सर्व प्रकारचे कापड घेणे, कपडे धुलाई, उपकरण देखभाल दुरुस्ती, एक्स-रे फिल्म खरेदी, विद्युत साहित्य खरेदी, फर्निचर घेणे व दुरुस्ती, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी खर्च आदी.