

कोल्हापूर ः कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्री पूर्ण झाले. दिवसभर शहरातील ए, बी आणि ई वॉर्डातील काही भागात पाण्याची टंचाई जाणवली. महापालिकेने टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला. पण तो अपुरा होता. दरम्यान, काम पूर्ण झाल्याने बुधवारपासून टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
मंगळवारी सकाळपासून टंचाईची तीवता भासत होती. मंगळवारी रात्री उशिरा काम पूर्ण झाले. त्यानंतर उपसा सुरू झाला. त्यामुळे बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व भागातील पुरवठा बुधवारी दुपारनंतर नियमित होणार आहे. बालिंगा योजना आणि शिंगणापूर योजना सुरू राहिल्यामुळे सी, डी आणि ई वॉर्डातील बहुतांश भागामध्ये पाण्याची टंचाई जाणवली नाही. ई वॉर्डातील कावळा नाका आणि ताराबाई पार्क टाकीवर अवलंबून असणाऱ्या भागात सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता.