राजेंद्र जोशी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागांतर्गत समन्वय नसला, की शहराच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ होतो. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुर्दशा चिंताजनक तर आहेच, पण त्याहीपेक्षा काही रस्त्याखालून जाणार्या सांडपाणी आणि जलवाहिन्या यांचीही स्थिती त्याहून खराब आहे. यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यापूर्वी या रस्ते अंतर्गत व्यवस्थेचे काम व्यवस्थित केले, त्याचे दोष निराकरण झाले, की वारंवार रस्ते खोदावे लागत नाहीत. तथापि, या व्यवस्थेची खातरजमा न करता सध्या महानगरपालिकेने रस्त्यावर डांबर ओतण्यास सुरू केले आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यांची अवस्था ‘आत ड्रेनेजचा कॅन्सर आणि वर डांबराची मलमपट्टी’ अशी झाली आहे.
शहरात शनिवारी बिनखांबी गणपती ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा या रस्त्याच्या डांबरीकरणाचा नारळ फोडण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि अंबाबाई मंदिराला जोडणार्या या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे, की वाहन चालवणार्याची कंबर आणि मणके पूर्णतः ढिले होऊन गेले आहेत. या रस्त्याचा प्रस्ताव जेव्हा पाठविण्यात आला होता, तेव्हा रस्त्याखालून जाणार्या ड्रेनेज चॅनेलचे रुंदीकरण करून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याजवळ येणार्या फिरंगाई मंदिर ते दुधाळी या मुख्य चॅनेलला जोडण्याची योजना तयार करण्यात आली होती. जोपर्यंत या चॅनेलचे काम होत नाही, तोपर्यंत रस्त्यावर डांबर ओतणेही निरर्थक आहे.
यामुळे चॅनेलचे काम विनाविलंब सुरू करावे आणि महिनाभराच्या कालावधीनंतर रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे, यावर गांभीर्याने चर्चाही झाली होती. संबंधित ड्रेनेज कामासाठी महानगरपालिकेकडे अमृत योजनेमधील शिल्लक असलेल्या निधी उपलब्ध करण्याचा मार्गही मोकळा होता. तथापि, महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. राजकीय पक्षांना जनतेला दर्शनी काम दाखवायचे आहे. या हट्टापायी ड्रेनेजचे काम बाजूला ठेवून रस्त्याच्या कामाचा नारळ फोडला. ड्रेनेज दुरुस्तीशिवाय होणारे हे काम अल्पावधीत निकामी होईल आणि पुन्हा नव्या डांबरीकरणाचे टेंडर काढावे लागेल, अशी अवस्था आहे.