

कोल्हापूर : वर्ल्ड वाईल्ड फंड संस्थेच्या आवाहनानुसार शनिवारी (दि. 22) रात्री 7.30 ते 8.30 एक तासासाठी शहराच्या विविध भागातील पथदिवे बंद ठेवण्यात आले. यामुळे शहर एक तास अंधारात असल्याची अनुभूती मिळाली.
अर्थ आवर ही वर्ल्ड वाइड फंड यांनी सुरू केलेली जागतिक चळवळ आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार एक तासासाठी दिवे व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करण्याचे आवाहन केले जाते. 190 हून अधिक देशांमध्ये अर्थ आवर उपक्रम राबवला जातो. व्यक्ती आणि संस्थांना संध्याकाळी अनावश्यक विद्युत दिवे बंद करून पृथ्वीप्रती बांधिलकी दर्शवण्यासाठी एक तास देण्यास प्रोत्साहित करणे हा उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. ‘निसर्गाची शक्ति’ ही यावर्षीच्या अर्थ आवरची थीम आहे.
कोल्हापूर महापालिकेसह इतर संस्था अर्थ आवर उपक्रमात सहभागी झाल्या. शनिवारी रात्री विद्युत विभागाकडून सर्व महावितरण शाखेच्या कार्यालयास शहरातील सर्व स्ट्रीटलाईट एक तासासाठी विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याचे कळविण्यात आले. त्यानुसार शहरातील महापालिका व आयआरबी अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे एक तासासाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र अंधार होता.