Kolhapur black spots | शहरात 13 ब्लॅक स्पॉट; बेफिकिरीमुळे अपघातांत वाढ

जीवघेण्या घटनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर; अनेकांची घरे उद्ध्वस्त : प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत
Kolhapur black spots
kolhapur | शहरात 13 ब्लॅक स्पॉट; बेफिकिरीमुळे अपघातांत वाढpudhari File Photo
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर : मध्यवर्ती चौकांसह गजबजलेल्या प्रमुख मार्गांवर वाहनांची अमर्याद गर्दी, वाहतूक नियंत्रणांकडे होणारे दुर्लक्ष आणि चालकांच्या बेफिकिरीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. निष्पापांचे बळी जात असून अनेक जायबंदी होत आहेत. वाहन नियंत्रणातील दोषांमुळे शहरात 13 ब्लॉक स्पॉट आहेत. जीवघेण्या घटनांमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अपघातामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतानाही वाहतूक नियंत्रण शाखा, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.

मृत्यूचा सापळा ठरणार्‍या सायबर चौकात अलीकडच्या काळातील अपघाताच्या भीषण घटना थरार माजविणार्‍या आहेत. दि. 2 जून 2024 मधील भीषण घटनेनंतर दि. 9 रोजी याच चौकात भरधाव ट्रकने सिग्नलला 7 वाहनांना चिरडले. त्यात 5 जण जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा याच चौकात दोन मोटारींचे अपघात झाले. वारंवार होणार्‍या अपघाताच्या घटनेमुळे सायबर चौकातील वाहतूक प्रश्न गंभीर बनला आहे.

केएसबीपी चौकाकडून सायबर चौकाकडे जाणारा मार्ग उताराचा असल्याने वाहने भरधाव येतात. सायंकाळी सात ते मध्यरात्रीपर्यंत धावणारी बहुतांश मोटारीसह अवजड वाहनांचाही वेग भरधाव, धोकादायक स्थितीत असतो. भरधाव वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे.

जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान शहर, जिल्ह्यात 525 अपघात; 385 मृत्यू

जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान अपघाताच्या 525 घटना घडल्या असून यात 385 जणांचा मृत्यू, तर 650 हून अधिक जायबंदी झाले. गतवर्षापेक्षा यावर्षी अपघातात वाढ झाली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, सांगली, राधानगरी मार्गावरही अपघाताच्या घटनांत वाढ झाली. शिवाजी पूल ते वाघबीळ मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरली आहे. भरधाव वाहनांची प्रचंड गर्दी, जीवघेणे खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे जीवाला धोका.

शहरातील मध्यवर्ती 13 ब्लॉकस्पॉट

1) सायबर चौक ते एन. सी.सी. 2) कोयास्कर चौक ते के. एस. बी. पी. पार्क 3) क्रशर चौक ते जुना वाशी नाका. 4) क्रशर चौक ते नवीन वाशी नाका. 5) संभाजीनगर चौक ते नागीवली चौक. 6) बिंदू चौक ते मिरजकर तिकटी. 7) हॉकी स्टेडियम चौक ते रेणुका मंदिर चौक. 8) साई मंदिर कळंबा ते आयटीआय कॉलेज. 9) शांतिनिकेतन स्कूल. 10) राजेंद्रनगर ते सुभाषनगर. 11) दाभोळकर चौक ते ताराराणी पार्क. 12) ताराराणी चौक ते तावडे हॉटेल. 13) व्हिनस कॉर्नर ते दाभोळकर चौक.

मध्यवर्ती चौकांतील अपघातातील निष्पाप बळी

कोल्हापूर शहर, उपनगरांतील मध्यवर्ती चौकात अलीकडच्या काळात झालेल्या अपघाताच्या भीषण घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. 2017 मध्ये उमा टॉकीज चौकात भरधाव एस. टी. बसने चौकात सिग्नलला थांबलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. पापाची तिकटी-गंगावेस रोडवर मोहरम विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या अपघातात मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांसह दोघेजण ठार झाले होते. मृत्यूचा सापळा ठरलेल्या सायबर चौकात 2 जूनला चालकाचा ताबा सुटलेल्या भरधाव मोटारीने धडक दिल्याने चालकासह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यात निवृत्त प्रकुलगुरू यांचा समावेश होता.

सायबर चौक नव्हे, मृत्यूचा सापळा : अपघात रोखण्यासाठी करावे लागणारे उपाय

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर गतिरोधक बसविणे आवश्यक आहे.

* सायबर चौकात दोन्ही बाजूला रम्बलबर बसविणे आवश्यक

* सायबर चौकाच्या चारही बाजूला झालेली अतिक्रमणे तत्काळ काढण्याची आवश्यकता

* सायबर चौकालगत असलेल्या शॉपसमोर वाहने अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने पांढरे पट्टे मारण्याची आवश्यकता

* केएसबीपी चौक ते सायबर चौक मार्गावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्यामुळेही व्यत्यय निर्माण होतो. फांद्या छाटणी व्हायला हवी

* सिग्नल चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारणे आवश्यक

* केएसबीपी चौक-सायबर चौक दरम्यानचा रस्ता दुभाजक वाहनांच्या धुरामुळे काळा बनला आहे. रात्रीच्या सुमाराला रस्ता दुभाजक स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे भरधाव वाहने रस्ता दुभाजकाला धडकतात. रस्ता दुभाजकावर पांढरा रंग लावून त्यावर पट्टे मारण्याची गरज

* केएसबीपी चौक ते सायबर चौक या मार्गावर सावधानतेसाठी साईन बोर्ड, वेग मर्यादेचे बोर्ड लावणे गरजेचे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news