Kolhapur News| हद्दवाढीशिवाय कोल्हापूरसह परिसराचा विकास अशक्य

लोकप्रतिनिधी, नागरिकांनी हद्दवाढीसाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता; आयुक्त राजेंद्र भारूड यांचे मत
Kolhapur News
आयुक्त राजेंद्र भारूड
Published on
Updated on

सुनील कदम, सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय केवळ कोल्हापूर शहरच नव्हे, तर शहरालगत असलेल्या गावांचा आणि परिसराचा विकास अशक्य असल्याचे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भारूड यांनी ठामपणे सांगितले.

प्रश्न : कोल्हापूरच्या हद्दवाढीची कितपत गरज आहे?

आयुक्त : १९७२ मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या २.५ लाखांच्या घरात होती आणि महापालिकेचे क्षेत्रफळ ६६ चौरस किलोमीटर होते. आज कोल्हापूरची लोकसंख्या ६ लाखांच्या घरात जाऊन पोहोचत आहे; पण क्षेत्रफळात मात्र १ इंचाचीही वाढ झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. शिवाय या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहेत. त्यासाठी हद्दवाढ हाच एकमेव उपाय आहे.

प्रश्न : हद्दवाढीअभावी कोणत्या समस्या जाणवतात?

आयुक्त : आहे त्याच क्षेत्रफळात जवळपास दुपटीहून अधिक झालेल्या लोकसंख्येला नागरी आणि पायाभूत सुविधा पुरविताना अनेक अडचणी जाणवतात. तशातच कोल्हापुरात येणारे लाखभर भाविक आणि पर्यटक यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविता येत नाहीत. त्यांची गैरसोय होते. त्याबाबत भाविक आणि पर्यटकांकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येते. आता तर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाले आहे. त्यामुळे दररोज आणखी ५० ते ६० हजार लोकांची या गर्दीत भर पडत चालली आहे. इथल्या नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या दीड-दोन लाख लोकांना नागरी सविधा आणि दैनंदिन सोयी-सुविधा पुरविण्याची महापालिकेची अवस्था राहिलेली नाही. महापालिकेची हद्दवाढ होऊन महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्यामुळे हद्दवाढ ही झालीच पाहिजे.

प्रश्न : हद्दवाढीला विरोध करणाऱ्या लोकांना आणि गावांना आपण काय सांगाल?

आयुक्त : जी १८ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे, ती बहुतांश गावे महापालिकेच्या परिवहन सेवेचा दैनंदिन लाभ घेत आहेत. काही गावांना महापालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठाही केला जात आहे. या १८ गावांमधील बहुतांश लोकांचा उद्योग, व्यापार, नोकरी-धंदा, खरेदी-विक्री, बाजार, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये, रुग्णालये, न्यायालये अशा वेगवेगळ्या निमित्ताने कोल्हापूरशी दैनंदिन संबंध आहे. अशा लोकांना महापालिकेच्या परिवहन सेवेसह अन्य सोयी-सुविधांचा दैनंदिन लाभही होतो आहे. अशावेळी महापालिकेच्या सेवा हव्यात; पण महापालिकेत आमचा समावेश नको, ही भूमिका चुकीची आहे. अशा लोकांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.

प्रश्न : हद्दवाढीमुळे कोणाचा कसा फायदा होईल?

आयुक्त : हद्दवाढीमुळे केवळ कोल्हापूर शहराचाच फायदा होईल, अशातला भाग नाही. हद्दवाढीमुळे कोल्हापूरच्या विकासाला तर चालना मिळेलच शिवाय नव्याने महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांनाही त्याच पटीत फायदा होईल. त्या गावांना सध्या मिळत असलेल्या नागरी सुविधांपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा मिळतील. त्या त्या गावातील जागांचे भाव वाढतील, त्या गावांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक विकासाला मोठ्या प्रमाणात कोल्हापूरच्या बरोबरीने चालना मिळेल.

आयुक्त : हद्दवाढीसाठी नेमके काय करायला पाहिजे?

आयुक्त : मुळात हद्दवाढीचा विषय हा काही मंडळींनी राजकीय पातळीवर नेऊन ठेवला आहे; पण या प्रश्नाकडे राजकीय पातळीवरून न बघता सामाजिक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. कोल्हापूरच्या स्थानिक आणि त्या १८ गावातील लोकांनीही आपला सर्वांगीण विकास कशात आहे, ते लक्षात घेण्याची गरज आहे. राज्यातील अन्य महापालिकांमध्ये समाविष्ट झालेल्या लगतच्या गावांची होत असलेली चौफेर प्रगती लक्षात घ्यावी, ही प्रगती विचारात घेऊन हद्दवाढीसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. कारण, कोल्हापूरची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहर व परिसराचा विकास अशक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news