

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या बहुप्रतीक्षित कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेच्या दिशेने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका परिपत्रकाद्वारे तीन न्यायाधीशांची विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, 18 ऑगस्टपासून प्रत्यक्ष सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार असून पूर्वतयारीला वेग आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास येत असताना सर्किट बेंचसाठी आवश्यक प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या नियुक्त्या त्याच प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले तीनही न्यायाधीश आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सांभाळत अतिरिक्त जबाबदारी म्हणून ओएसडीपदाचे कामकाज पाहणार आहेत. पुणे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्या. व्ही. आर. काचरे, अहमदनगरचे 24 वे संयुक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. तोंडचिरे यांचा यामध्ये समावेश आहे.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजासाठी उच्च न्यायालयाने बॉम्बे उच्च न्यायालय अपिल बाजू (सुधारणा) नियम, 2024 लागू केला आहे. याअंतर्गत न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यापासून ते कामकाजासंबंधी विविध आदेश व परिपत्रके जारी करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ओएसडी म्हणून नियुक्त झालेले हे तीन न्यायाधीश सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजापूर्वीची सर्व प्रशासकीय व्यवस्था सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या निर्णयामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक वर्षांची लढाई यशस्वी ठरल्याने आता न्याय मिळवण्यासाठी मुंबईला जाण्याचा त्रास वाचणार आहे.