

Chipri Bandh Protest
जयसिंगपूर : चिपरी (ता.शिरोळ) येथील संदेश लक्ष्मण शेळके (वय 21, रा. चिपरी) या युवकाच्या खुनाची घटना समाजाला काळीमा फासणारी आहे. खुनातील मारेकऱ्यांना कोणीही मदत करू नका. त्यांची घरे अतिक्रमणामध्ये असून ती हटवा व फाशीची शिक्षा द्या, अशी तीव्र भावना व्यक्त करीत चिपरी येथील हजारो नागरिक गाव बंद ठेवून आज (दि.१३) रस्त्यावर उतरले . गावातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले.
चिपरी येथील खूनाच्या घटनेनंतर गुरुवारी (दि.7) रोजी धनगर समाजाचे नागरिकांनी जयसिंगपूर पोलिसांना निवेदन दिले होते. त्यानंतर आज समस्त चिपरीकर गाव बंद ठेवून सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत चौकात एकत्रित जमले. यावेळी माजी सरपंच सुरेश भाटीया, ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत कांबळे, धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष अमर पुजारी, हरोलीचे सरपंच तानाजी माने, माजी सरपंच सुदर्शन पाटील यांनी तीव्र भावना व्यक्त केल्य़ा.
गावात मुलींची छेडछाड करणे, त्यांना भावनिक ब्लॅकमेल करून प्रेमविवाह करण्यास भाग पाडणे व आईवडिलांना शस्त्राचा धाक दाखविणे अशा गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी पालकांबरोबर पोलिसांनीही पुढाकार घ्यावा, असे सांगितले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच दीपिका परीट, उपसरपंच बबीता पांडव, तंटामुक्त अध्यक्ष रणजित आवळे, श्रीकांत पवार, शीतल पाटील, अमोल मरळे, संदिप गावडे, बाच्यू बंडगर, विश्वजीत कांबळे, अभय पाटील, मनोज राजगिरे, शिवाजी बेडगे, भरत जांभळे, संभाजी भोसले, रमेश रजपूत यांच्यासह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.