

कोल्हापूर : देश-विदेशातील सहलींचे आकर्षक पॅकेज दाखवून कोल्हापूर शहरातील उद्योजक, व्यावसायिक आणि भाविकांना लाखो रुपयांना गंडा घालणार्या ‘शौर्य यात्रा’ कंपनीचा सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. मयुरेश नामदेव वाघ (वय 28, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पाचजणांकडून तब्बल 4 लाख 48 हजार रुपये उकळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
संशयित वाघ याने 2024 च्या सुरुवातीला लक्ष्मीपुरी येथील फोर्ड कॉर्नर परिसरात ‘शौर्य यात्रा’ कंपनीचे कार्यालय थाटले होते. दुबई, नेपाळ, केरळ आणि चारधाम यासारख्या सहलींसाठी त्याने अत्यंत कमी दरात आकर्षक पॅकेजेस जाहीर केली. त्याच्या भूलथापांना बळी पडून अनेक नागरिकांनी त्याच्याकडे आगाऊ रक्कम जमा केली. मात्र, मे 2024 मध्ये तो अचानक कार्यालयाला कुलूप लावून पसार झाला, तेव्हा फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी महेश मनोहर पन्हाळकर (वय 61, रा. लक्ष्मीपुरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पन्हाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुबई सहलीचे आमिष दाखवून वाघ याने तब्बल 2 लाख 32 हजार रुपये उकळले होते. याशिवाय नरेंद्र माधव कुलकर्णी यांना दुबई, नेपाळसह चारधाम सहलीच्या आमिषाने 1 लाख 41 हजार, सुरेश राजाराम देसाई यांच्याकडून नेपाळ सहलीच्या बहाण्याने 38 हजार 500 रुपये उकळले. राजेंद्र रघुनाथ वेल्हाळ व विश्वनाथ प्रल्हाद गुळवणी यांच्याकडून अनुक्रमे केरळ व चारधाम सहलीच्या बहाण्याने 23 हजार 400 व 32 हजार रुपये उकळले आहेत. पाच जणांची देश-विदेशातील सहलींच्या आमिषाने 4 लाख 48 हजारांची फसवणूक करून संशयिताने पोबारा केला आहे, असेही तपासाधिकारी गायकवाड यांनी सांगितले.