

Chandgad Tilari Ghat Woman Body Found
चंदगड : चंदगड तालुक्यातील कळसगादे गावाच्या हद्दीतील तिलारी घाट परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेशर पॉईंटजवळ रस्त्यालगतच्या जंगलातील झुडपामध्ये हा मृतदेह आढळला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.
मृत महिला अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिच्या अंगावर डिझाईन असलेली साडी आणि सोनेरी रंगाचा ब्लाऊज होता. तसेच पायात चांदीची जोडवी, पैंजण आणि कानात सोनेरी झुबे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मात्र, मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे काळवंडलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटविणे कठीण झाले आहे. शुक्रवारी (दि. २९) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी कळसगादे-कोदाळी गावचे पोलीस पाटील सदानंद विठू सुतार यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास करण्यात येत आहे.