Kolhapur Burglary | चंदगडमध्ये जवानाचे घर भरदुपारी फोडले; अर्ध्या तासात दोन लाखांचे दागिने लंपास

नागरदळे (ता. चंदगड) येथे उसाच्या शेतातून आलेल्या दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद; कटावणीने कुलूप तोडून घरात प्रवेश
Chandgad Nagardale Burglary
Chandgad Nagardale BurglaryPudhari
Published on: 
Updated on: 

Chandgad Nagardale Burglary

चंदगड : नागरदळे (ता. चंदगड) येथे भरदुपारी चोरीची घटना घडली असून, अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचे घर फोडून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने लंपास केले. बुधवारी (दि. ११) करेकुंडी रस्त्यावरील जवान रामदास भरमू पाटील यांच्या घरात ही चोरी झाली. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित चोरटे कैद झाले आहेत.

याप्रकरणी रामदास पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक नजरुद्दीन शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. फुटेजमध्ये घराच्या मागील बाजूने उसाच्या शेतातून दोन तरुण घराकडे येताना दिसत आहेत.

Chandgad Nagardale Burglary
Kolhapur Chandrakant Patil warns Satej Patil | मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले तर तुमचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल

रामदास पाटील हे सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत असून, आठ दिवसांपूर्वी सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या घरात पूजा पाटील, त्यांचे सासरे भरमू पाटील आणि दोन नाती राहतात. बुधवारी पूजा पाटील या माहेरी करेकुंडी येथे भात कापणीसाठी गेल्या होत्या. तर भरमू पाटील हे नातवंडांना घेऊन शेजारी राहणारे अरुण पाटील यांच्या घरी गेले होते.

घराच्या तिन्ही बाजूंना उसाची शेती असून, जवळपास अन्य वस्ती नाही. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी मागील बाजूने उसाच्या शेतातून प्रवेश केला. कटावणीच्या साहाय्याने घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून ते आत शिरले. त्यानंतर घराला आतून कडी लावली आणि मागील दरवाजातून दुसऱ्या साथीदाराला घरात घेतले. दोघांनी लोखंडी कपाट फोडून त्यातील दागिने चोरले.

Chandgad Nagardale Burglary
Sugarcane Fire Kolhapur | शिरगावात शॉर्टसर्किटने पाऊण एकरातील ऊस जळून खाक

चोरट्यांनी सात तोळे वजनाचे चांदीचे पैंजण (किंमत १० हजार ५०० रुपये), पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील कुडे (६० हजार रुपये), पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या रिंगा (६० हजार रुपये) आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (६० हजार रुपये), असे एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लंपास केले.

दरम्यान, सुमारे अर्ध्या तासाने भरमू पाटील घरी परतले असता मुख्य दरवाजाला आतून कडी लावलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घराच्या मागील बाजूला जाऊन हाका मारल्या; मात्र तोपर्यंत चोरट्यांनी चोरी करून मागील दरवाजातून उसाच्या शेतात पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुणांचा सहभाग स्पष्ट होत असून, चंदगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.