

कोल्हापूर : शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, साऊंड सिस्टीमचा दणदणाट, आसमंत उजळून टाकणार्या विद्युत रोषणाईत शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संयुक्त रविवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी मंडळांच्या वतीने मिरवणुका काढण्यात आल्या. बिनखांबी गणेश मंदिर चौकापासून पापाची तिकटी असा मिरवणुकीचा मार्ग होता. यावेळी ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या जयघोषाने शहर दुमदुमले.
मंडळांनी साऊंड सिस्टीम मिरजकर तिकटी व खरी कॉर्नर परिसरात दुपारीच आणल्या होत्या. संयुक्त रविवार पेठ, संयुक्त राजारामपुरी, संयुक्त शाहूपुरीच्या मिरवणुका सायंकाळी मिरवणूक मार्गावर आल्या. संयुक्त शाहूपुरीच्या मिरवणुकीचे उद्घाटन सहायक पोलिस निरीक्षक संजय नाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निखिल भिसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संयुक्त राजारामपुरी मिरवणुकीचे उद्घाटन पुष्पकराज क्षीरसागर यांच्या हस्ते व मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाले. मिरवणुकीत घोडे, पारंपरिक वेशभूषेतील मावळे, शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मर्दानी आखाड्यातील खेळाडूंनी लाठी, दांड पट्टा, फरी, तलवार, लिंबू फोडणीची प्रात्यक्षिके सादर केली. लेझर शोच्या झगमगाटात रात्री उशिरापर्यंत मिरणुका सुरू होत्या.
मंडळांच्या मिरवणुका दुपारीच मार्गावर होत्या. मात्र, सायंकाळी महाद्वार रोडवरून मार्गस्थ होऊ लागल्या. त्यामुळे मिरजकर तिकटी ते बिनखांबी, खरी कॉर्नर ते बिनखांबी, निवृत्ती चौक ते बिनखांबी रस्ता बॅरिकेटस् लावून वाहनांसाठी बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. पोलिसांनी सायंकाळी सातनंतर मंडळांना मिरवणूक मार्गावरून पुढे हलवले. हा रस्ता दुचाकी, चारचाकी वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब केला.