

कोल्हापूर : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा (वय 47) यांच्याकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी स्नेहा संजय नारकर (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिच्यासह पाचजणांविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मर्दा यांनी सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. जयसिंगपूर येथील नितीन जंगम यांना गंडा घातल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी नारकर हिला नुकतीच अटक केली आहे.
नारकर हिच्यासह शांताबाई वाळकुंडे (रा. यशवंतनगर, इचलकरंजी), संतोष पाटील (चिपरी, ता. शिरोळ), शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर), रामचंद्र (नारकर हिच्या मोटारीचा चालक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगण्यात आले. शहापूर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मर्दा यांची तारदाळ येथे सायझर्स कंपनी आहे. स्नेहा नारकर हिने ओळख वाढवून आपण कोल्हापूर येथील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचे भासविले. व्यवसाय वाढीसाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांकडे तारण असलेले सोन्याचे दागिने लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
व्यावसायिक मर्दा यांच्याकडे 3 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकीही महिलेने दिली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. 12 मे ते 25 मे 2025 या काळात हा प्रकार घडला. स्नेहा नारकर हिला दुसर्या एका गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचाही शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.