

इचलकरंजी : खुनाची पाच लाखांची सुपारी मिळाल्याचे सांगून कबनुरातील व्यावसायिकाकडे गुप्तीचा धाक दाखवत जर्मनी गँगने 30 हजारांची खंडणी मागितली. तसेच जबरदस्तीने 700 रुपये काढून घेत व्यवसाय करू न देण्याची धमकी दिली.
याप्रकरणी कारागृहात असणार्या मेहबूब इस्माईल उकली (वय 24, रा. जवाहरनगर) याच्यासह त्याचे दोन साथीदार सचिन ऊर्फ शाम बाळासो घोरपडे (वय 24) व करण आण्णाप्पा वडर (वय 30, दोघे रा. कबनूर) या तिघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याची फिर्याद हुसेन बशीर मुजावर (वय 40, रा. मुजावर गल्ली, कबनूर) यांनी दिली आहे. याची माहिती पो. नि. दिलीप पवार यांनी दिली.
कबनूर येथे मे महिन्यात मुजावर यांना जर्मनी गँगमधील मेहबूब उकली व करण वडर यांनी तुझ्या खुनाची पाच लाखांची सुपारी मिळाली आहे. तुला व्यवसाय करायचा असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे धमकावले. दोन दिवसांपूर्वी पुन्हा कबनूर ग्रामपंचायतीजवळ तिसरा संशयित सॅम ऊर्फ शाम घोरपडे याने हुसेन मुजावर यांना धमकावले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी तिघा संशयितांपैकी सचिन ऊर्फ शाम बाळासो घोरपडे याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर संशयित वडर हा पसार आहे. कारागृहात असलेल्या उकली याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती स. पो. नि. शरद वायदंडे यांनी दिली.