कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या वासाच्या दुधाच्या दरात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय गोकुळच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी घेण्यात आला. म्हशीच्या वासाच्या दुधाला प्रतिलिटर 6 रुपयांवरून 12 रुपये तर गायीच्या वासाच्या दुधाला 4 रुपयांवरून 8 रुपये इतका दर मिळणार आहे. अध्यक्षस्थानी गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ होते.
वासाच्या दुधावर अन्न व औषध प्रशासन कायद्यानुसार निर्बंध असले तरी सदस्य व नेत्यांच्या सूचनेनुसार ही वाढ देण्यात येत असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. सभेत त्यांनी गोकुळच्या भावी योजनांची माहिती दिली. त्यात आईस्क्रीम व चीज उत्पादन सुरू करणे, सीएनजी पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणे, दूध तपासणीसाठी बायबॅक पद्धतीने नवीन यंत्रे देणे, बासुंदी तसेच अंजीर व गुलकंद बासुंदीचे उत्पादन, ओला/ वाळलेला चारा मिश्रित आयडीयल टी.एम.आर. उत्पादन, बिद्री चिलिंग सेंटरमध्ये एक्स रे मशिन बसविणे, गडहिंग्लजमध्ये मुर्हा म्हैस विक्री केंद्र सुरू करण्याची योजना आहे.
गेल्या पाच वर्षांत म्हैस व दूध खरेदी दरात अनुक्रमे 13 व 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इमारत बांधकाम अनुदानात आठ हजार रुपयांची वाढ, भविष्य कल्याण योजनेत सुधारणा तसेच ब वर्ग सहकारी संस्था बंद करून त्यातील 31 कोटी 74 लाख 88 हजार रुपये 2521 संस्थांना परत देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. संस्थांच्या प्रोत्साहन रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सभेस संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, किसन चौगुले, बाबासाहेब चौगुले, अजित नरके, रणजितसिंह पाटील. अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, चेतन नरके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, कर्णसिंह गायकवाड, अंबरिशसिंह घाटगे आदी उपस्थित होते.
गोकुळ अहवालामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. राजेंद्र पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी आमदार, माजी खासदारांचे फोटो आहेत. त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा आणि अहवाल मात्र आघाडीचा अशी चर्चा सुरू होती.