

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथून संभाजीनगरकडे जाणार्या आणि पार्सल वाहतूक करणार्या ब—ेकफेल एसटीने सायबर चौकात मंगळवारी सायंकाळी थरार घडविला. रस्त्यावर आडवे आलेल्या मोकाट जनावरांना चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब—ेक लावला खरा; पण ब—ेक निकामी झाल्याने ताबा सुटला, तरीही प्रसंगावधान राखत चालकाने एसटी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या 4 मोपेडना धडक दिली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
मध्यवर्ती आणि सतत वर्दळ असलेल्या सायबर चौकात ही घटना घडल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी धाव घेतली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने फुटपाथवर खाद्य पदार्थ खाण्यासाठी आलेल्या कोणालाही ईजा झाली नाही. मात्र, एसटीने धडक दिलेल्या चारही मोपेडचे मोठे नुकसान झाले आहे.
गतवर्षी जूनमध्ये एका मोटारीच्या अपघातात निष्पाप वाहनधारकांचा मृत्यू झाला होता. याच चौकात ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, प्राणहानी टळल्याने अधिकार्यांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, गोकुळ शिरगाव येथील कार्यशाळेतून संबंधित एसटी संभाजीनगर येथील बस स्थानकाकडे जात होती. सायबर चौक-एन.सी.सी. ऑफिस मार्गावर अचानक मोकाट जनावरे आली. जनावरांना चुकविण्यासाठी चालकाने ब—ेक मारला. मात्र, ब—ेक निकामी झाल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालकाने एसटी डाव्या बाजूला नेली. यावेळी खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर काही नागरिक थांबले होते. एसटीने चार दुचाकींना धडक दिली. त्यामध्ये वाहनांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.