

सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर धार्मिक आणि पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आले आहे. कोल्हापूरची लोकसंख्या सुमारे सात लाख, आजूबाजूच्या ग्रामीण भागातून दररोज येणारे सुमारे दोन लाख नागरिक आणि सुमारे एक लाख भाविक-पर्यटक अशा सुमारे 10 लाखांवर लोकसंख्येचा कोंडमारा अस्तित्वातील जागेतच होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सांगलीसह इतर शहराची हद्दवाढ झाली. मात्र सर्व सुविधा आणि क्षमता असूनही कोल्हापूरची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा वेध घेणारी मालिका आजपासून...
कोल्हापूर : नगरपालिकेचे 15 डिसेंबर 1972 रोजी महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर तब्बल 54 वर्षे उलटली तरी अद्याप एक इंचही कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. केवळ राजकारणामुळे कोल्हापूरची हद्दवाढ रखडली आहे. त्यामुळे कोल्हापूरचा विकास खुंटला आहेच; त्याबरोबरच आजूबाजूच्या ग्रामीण भागही ठप्प झाला आहे. विकासाच्या आशा धुळीस मिळत असताना, लोकप्रतिनिधींनी आपापले राजकीय अजेंडे बाजूला ठेवून शहराच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा, ‘हद्दवाढ लटकली... राजकारणातच अडकली!’ हीच अवस्था पुढील अनेक वर्षे कायम राहण्याची भीती आहे.
शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्येचा ताण आणि नागरी सुविधांवरील वाढता दबाव लक्षात घेता हद्दवाढ आता काळाची गरज बनली आहे. मात्र केवळ राजकारणाच्या कचाट्यात हा प्रश्न अडकून पडल्याने कोल्हापूर अद्यापही एक मोठ्ठं खेडं बनून राहिले आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी हद्दवाढ पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून, यामागे राजकीय विरोध कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट आहे.
हद्दवाढीमुळे शहराच्या हद्दीत येणार्या गावांना अधिक सुविधा, पायाभूत विकास आणि आर्थिक संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र त्याचबरोबर कर आकारणी वाढणार, स्थानिक स्वायत्तता कमी होणार, असे भीतीचे वातावरण निर्माण करून राजकीय फायद्यासाठी मुद्दाम विरोध वाढवला जात आहे. परिणामी नागरिकांच्या हितापेक्षा राजकीय गणितेच महत्त्वाची ठरत असल्याचे वास्तव आहे.
लोकसंख्येअभावी केंद्रीय योजनांचा लाभ किंवा निधी कोल्हापूरला मिळत नसल्याचे वास्तव आहे. मूलभूत सुविधा पुरविण्याचा अतिरिक्त भार महानगरपालिकेवर पडत आहे. परिणामी कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची असताना राजकीय विरोधामुळे ती रखडली आहे. आता तर जनगणना झाल्याशिवाय हद्दवाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा हद्दवाढ लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे.
हद्दवाढीशिवाय पर्याय नाही...
कोल्हापूर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढत्या नागरी समस्या लक्षात घेता, हद्दवाढीशिवाय पर्याय नाही. वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विस्तारित नियोजनाची गरज आहे. मात्र, हद्दवाढच रखडल्याने या सर्व प्रश्नांवर परिणामकारक उपाययोजना करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.