

कोल्हापूर ः हद्दवाढ नसल्याने केएमटीची सेवा बंद करा, पाणीपुरवठा बंद करा, अशी मागणी करणार्या हद्दवाढ समर्थक कृती समितीला महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व स्थानिक लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक झाल्यानंतर याचा निकाल मिळेल. तोपर्यंत प्रतीक्षा करणे उचित ठरेल, असा सल्ला दिला.
दरम्यान, ग्रामीण भागाला सुविधा देण्यावरून कृती समितीने बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. हद्दवाढीचा निर्णय घेऊनच निवडणुका घ्या, अशी मागणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे स्वतंत्रपणे भेटून केली. बाबा इंदूलकर म्हणाले, केएमटी ग्रामीण भागाला सेवा देण्यासाठी 20 कोटी खर्च करते. घरफाळा, पाणीपट्टी स्थानिक शहरवासीयांकडून संकलित करता आणि शहरात पाणी कमी आणि ग्रामीण भागाला जास्त पुरवठा करता, हे आता थांबविले पाहिजे.आर. के. पोवार यांनी केएमटीसह इतर सेवा बंद करा, असा आग्रह धरला. बाबा पार्टे म्हणाले, हद्दवाढीच्या विरोधात काही गावांनी बंद पुकारला. त्यामध्ये महापालिकेचे कर्मचारी सहभागी होते. त्यांच्यावर कारवाई करा. शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, हद्दवाढीसाठी प्रशासनाचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रशासनाकडूनही सक्रिय सहभाग घेत पाठपुरावा केला पाहिजे. अशोक भंडारे यांनीदेखील किती वर्षे आंदोलन करायचे? आता हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली. दिलीप देसाई यांनीदेखील हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली.