Kolhapur boundary expansion |पालकमंत्री आबिटकर, आ. क्षीरसागर, नरके यांच्या राजकारणात कोल्हापूरची हद्दवाढ रखडली

सर्वपक्षीय कृती समितीचा आरोप; हद्दवाढीसाठी आंदोलन तीव्र करणार
Kolhapur boundary expansion |पालकमंत्री आबिटकर, आ. क्षीरसागर, नरके  यांच्या राजकारणात कोल्हापूरची हद्दवाढ रखडली
Published on
Updated on

कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर आणि आ. चंद्रदीप नरके यांच्या एकमेकांना चिंबवाचिंबवीच्या राजकारणात कोल्हापूरची हद्दवाढ रखडली, असा आरोप सर्वपक्षीय नागरी कृती समितीने शनिवारी (दि.16) पत्रकार परिषदेत केला. तसेच हद्दवाढसाठी आंदोलन यापुढे आणखी तीव्र केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी फसवणूक केली

बाबा इंदुलकर म्हणाले, करवीरचे आ. नरके हे तेथे विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहेत. जनतेला तोंड दाखवायला त्यांना जागा नाही. त्यामुळेच बागुलबुवा करून जनतेला फसविण्यासाठीच त्यांनी मेलेल्या प्राधिकरणला विशेष नियोजनचा दर्जा मिळवून घेतला. पालकमंत्री आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, महापालिका प्रशासक, आ. नरके यांनी हद्दवाढीला आमचा विरोध नाही असे सांगून आमची फसवणूक केली आहे.

काही नसताना गावे विरोध करत आहेत, मग सक्षम झाल्यावर हद्दवाढीत कशाला येतील? कोल्हापूरची हद्दवाढ करायचीच आहे तर अंमलबजावणीची तारीख टाकून आज अधिसूचना काढावी.

पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

दिलीप देसाई म्हणाले, पालकमंत्री आबिटकर, आ. क्षीरसागर, आ. नरके यांच्यात ताळमेळ नाही. आ. क्षीरसागर यांची भूमिका कोल्हापूर हद्दवाढीसाठी सकारात्मक आहे. परंतु, पालकमंत्र्यांना त्यांचे राजकीय खच्चीकरण करायचे आहे. पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

बाबा पार्टे यांनी प्राधिकरणला विशेष दर्जा देऊन एखाद्या अधिकार्‍याला बसवून खंडणी गोळा केली जाईल, असा आरोप केला. यावेळी अशोक भंडारे, अनिल कदम, अनिल घाटगे, किशोर घाटगे, राजू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

500 कोटी गेले कुठे?

संजय पोवार-वाईकर म्हणाले, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करताना 500 कोटी निधीची घोषणा केली होती. आजपर्यंत ती रक्कम आलेली नाही. आता प्राधिकरणला विशेष दर्जा देऊनही काही उपयोग होणार नाही. प्राधिकरणातील गावांचा विकास होणार नाही. त्याऐवजी कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news