Kolhapur boundary expansion| कोल्हापूरची हद्दवाढ 8 गावांसह करा
कोल्हापूर : कोल्हापूर शहरालगतच्या आठ गावांसह हद्दवाढ करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. कोल्हापूर शहराशी पूर्णपणे एकरूप झालेल्या, हद्दीच्या सीमा पूर्णपणे पुसलेल्या तसेच पंचगंगा नदी आणि पुणे-बंगळूर महामार्गाच्या आतील या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करत असल्याचे पत्र संबंधित गावांना द्या, तसा गावांच्या नावासह सुधारित प्रस्ताव सादर करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यामुळे आठ गावांसह शहराची हद्दवाढ द़ृष्टिक्षेपात आली आहे.
महापालिकेच्याच नव्हे तर तत्पूर्वी नगरपालिकेच्या स्थापनेपासूनही शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. याउलट कोल्हापूरनंतर महापालिका अस्तित्वात आलेल्या राज्यातील अनेक शहरांची दोन-तीन वेळा हद्दवाढ झाली. राजकीय हट्टापायी मात्र कोल्हापूरची हद्द जराही पुढे सरकली नाही. हद्दवाढीवरून लोकप्रतिनिधींतही दोन भूमिका आहेत. शहरातील लोकप्रतिनिधींनी हद्दवाढीसाठी कंबर कसली आहे तर लगतच्या गावांचा मतदारसंघ असलेल्या लोकप्रतिनिधींनी विरोधी भूमिका घेतली आहे. याबाबत हद्दवाढ कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समित्याही आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर हद्दवाढीअभावी खुंटलेल्या शहराच्या विकासाला चालना मिळावी, याकरिता गेल्या काही दिवसांपासून विरोध असणार्या लोकप्रतिनिधींची समजूत काढून हद्दवाढीसाठी त्यांना सहमत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता.
कोल्हापूरची हद्दवाढ करा, या मागणीसाठी मंगळवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक व सत्यजित कदम यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांची भेट घेतली. या भेटीत शहराच्या हद्दवाढीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी नगर विकास खात्याचे सचिव के. एच. गोविंदराज उपस्थित होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे ही काळाची गरज आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तरच शहराचा आणि त्याबरोबरच शहरालगत असलेल्या गावांचा विकास होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ करायलाच हवी. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हद्दवाढीसाठी शहराला एकरूप झालेल्या 8 गावांची नावे घालून महापालिकेकडून नवीन प्रस्ताव घ्यावा, अशी सूचना केली. त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तत्काळ निर्णय घ्यावा, असे मत मांडून महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले.
हद्दवाढीत समाविष्ट होणारी गावे
उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगा (मूळ गावठाण वगळून) पाडळी (मूळ गावठाण वगळून) या गावांचा समावेश करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या गावांना महापालिका समावेशाबाबतचे पत्र देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका देणार आहे.

