कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ गरजेचीच आहे. राज्य शासन हद्दवाढीसाठी सकारात्मक असून, हद्दवाढ अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
कोल्हापूर फर्स्ट संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खा. शाहू महाराज प्रमुख उपस्थित होते. खा. महाडिक म्हणाले, आता हद्दवाढ झाली नाही, तर पुढील आणखी काही वर्षे हद्दवाढ होणार नाही. त्यामुळे हद्दवाढीला लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी विरोध करू नये. कारण, 2027 मध्ये विधानसभा मतदारसंघ फेररचना होणार आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता भाग येईल, हे कुणालाच सांगता येणार नाही.
दरम्यान, गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची मागणी आहे. 2016 ला तत्त्वत: मान्यता मिळाली; मात्र पुढे हालचाली झाल्या नाहीत. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील गड-किल्ले, सांस्कृतिक वारसा, पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्याचा विकास होईल. त्यासंदर्भात अधिवेशनात मुद्दे उपस्थित करावेत, अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी बैठकीत केली. खा. शाहू महाराज व खा. महाडिक यांनी संसदीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची ग्वाही दिली.
उद्योजक सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शानभाग, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे, राजू लिंग्रस, अॅड. सर्जेराव खोत यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक बापू कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. आर. एम. कुलकर्णी, बाबासो कोंडेकर, उज्ज्वल नागेशकर, अजय कोराणे, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.