कोल्हापूर : सादळे-कासारवाडी परिसरात गव्यांचा कळप
कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : सादळे-कासारवाडी येथील जुने जिनिसेस कॉलेजजवळील रविवारी (दि. ४) दिवसभर सुमारे वीस गव्यांचा कळप ठिय्या मारून होता. गव्यांचा कळप पाहण्यासाठी घाटात स्थानिक नागरिक व पर्यटक गर्दी केली होती. तर काही अती उत्साही नागरिक जीवावर उदार होऊन कळपाच्यामागे धावत होते.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास वीस गव्यांचा कळप मादळे येथून सादळे कासारवाडी घाटातील जुने जिनसेस कॉलेजच्यामागील दाट झाडीतून येताना स्थानिक नागरिकांनी पाहिला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. काही वेळातच सादळे व कासारवाडीतील नागरिक गव्यांचा कळप पाहण्यासाठी येथे गर्दी करू लागले. यातच रविवार असल्याने जोतिबा व पन्हाळा जाणाऱ्या पर्यटकांची ही गर्दी होऊ लागली. रस्त्यावरून अगदी थोड्या अंतरावर गव्यांचा कळप थांबल्याने नागरिक, पर्यटक पाहून आपल्या मोबाईल मध्ये फोटो घेत होते तर काही अति उत्साही नागरिक गव्यांचा कळप हकलण्यासाठी त्यांच्याकडे जात होते. यावेळी काही गवे इतरत्र धावत होते हा कळप मनपाडळेच्या दिशेने गेला पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा जमिनीस कॉलेजच्या पाठीमागील झाडीत येऊन थांबला. दुपारी पुन्हा हा कळप मनपाडळे डोंगरभागात गेला. दरम्यान शनिवारी रात्री बाळासो खाडे यांच्या ज्वारी पिकाचा फडशा गव्यांनी पाडला होता.
दाजीपूर अभयारण्यात ज्याप्रमाणे गवे फिरतात अशा पद्धतीने गवे सादळे कासारवाडी घाटात वावरताना अनुभव पर्यटक घेत होते. बघायची गर्दी झाली होती. घाटाच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून पर्यटक गवे आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते.

