गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी 41 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले. दोन दिवसात एकूण 60 उमेदवारां चे 76 अर्ज दाखल झाले आहेत.
आज बुधवारी दुसऱ्या दिवशी भोगावतीचे विद्यमान व्हा. चेअरमन उदयसिंह पाटील (कौलवकर) यांच्यासह कृष्णराव पाटील, एस ए पाटील, जयवंत कांबळे या तीन विद्यमान संचालकांनी अर्ज दाखल केले. जेष्ठ संचालक ए डी पाटील यांनी आपले सुपुत्र अभिजीत पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणुन स्वाक्षरी केल्याने श्री. पाटील आता रिंगणाबाहेर राहणार हे स्पष्ट झाले आहे.
भोगावती चे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) यांनी आज आपला आणखी एक अर्ज दाखल करताना आपल्या पत्नी सौ. रुपाली पाटील यांचाही अर्ज सर्वसाधारण गटातून दाखल केला. याशिवाय माजी चेअरमन सदाशिवराव चरापले यांच्यासह चार माजी संचालकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गट क्रमांक सहा हसुर दुमाला आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती या राखीव गटातून मात्र दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अन्य सर्व गटात मात्र उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अद्याप सहा दिवसांची मुदत असली तरी या सहा दिवसात सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने आता केवळ तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शिल्लक राहिले आहेत. गटवार दाखल झालेले अर्ज असे,गट क्रमांक एक कौलव (12), गट क्रमांक दोन राशिवडे बुद्रुक( 9), गट क्रमांक तीन कसबा तारळे(2), गट क्रमांक चार कुरुकली(17), गट क्रमांक पाच सडोली खालसा (22), महिला राखीव गट (7),अनुसूचित जाती जमाती गट( 3),इतर मागासवर्गीय गट(4)