

सुनील सकटे
कोल्हापूर : महापुराचा धोका टाळण्यासाठी सांगली फाटा ते उचगाव पिलर पुलासह बास्केट बिजसाठी ठेकेदार निश्चित झाला आहे. लवकरच वर्कऑर्डर दिली जाणार आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून पिलर पुलाबाबत आग््राही भूमिका घेत हा प्रश्न तडीस लावला आहे.
गेली अनेक वर्षे कोल्हापूरला महापुराचा फटका बसत आहे. 2019 साली महापुराने जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटून महामार्गावर पाणी आल्याने पुणे-बंगळूर महामार्ग आठ दिवस बंद झाला होता. त्यामुळे पिलर पुलाची मागणी होती. यासंदर्भात दै. ‘पुढारी’ने सातत्याने हा प्रश्न लावून धरला. सांगली फाटा ते उचगाव पिलरच्या उड्डाणपुलासाठी साडेसातशे कोटींच्या कामासाठी ठेकेदारही निश्चित केला आहे. लवकरच वर्कऑर्डर देण्यात येणार आहे. 5 किमी लांबीच्या उड्डाणपुलासाठी विशिष्ट आकाराचे पिलर उभारण्यात येणार आहेत. पंचगंगा नदीवर मोठा पूल, तर उचगाव येथे लहान पूल आणि रेल्वे पुलाचा समावेश आहे. नागरिकांसाठी भुयारी मार्गाचाही समावेश आहे. पिलर पुलामुळे महापुराच्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यास मदत होणार आहे.
दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश
सांगली फाटा ते उचगाव या मार्गावर भिंतीऐवजी पिलरचा पूल उभारण्यात यावा यासाठी दै.‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठविला आहे. या कामासाठी निविदा प्रसिद्ध झाल्याने दै.‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश आले आहे.