

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचा आदेश व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गणेशमूर्ती कृत्रिम विसर्जन कुंडात सोडाव्यात, अशा फलकासह नदी घाटाकडे जाणार्या रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेडस् हटवून हिंदुत्ववादी संघटनांनी गणेशमूर्तींचे पंचगंगेतच विसर्जन केले. यानंतर दिवसभर नागरिकांनीही गणेशमूर्तींचे विसर्जन थेट नदीपात्रात केले. दुपारनंतर विसर्जनासाठी नदी घाट आबालवृद्धांच्या गर्दीने अक्षरश: फुलल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती.
हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार घोषणाबाजी करत बॅरिकेडस् हटवून गणेशमूर्ती पंचगंगा नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली. वर्षभर पंचगंगेत गटार-ड्रेनेज, विविध उद्योग, साखर कारखाने यांचे प्रदूषित पाणी सोडले जाते, त्यावेळी महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठे असते? असा सवाल करत गणेशमूर्ती नदीतच सोडल्या. आंदोलनात उदय भोसले, सुशील भांदिगरे, गजानन तोडकर, विक्रमसिंह जरग, गणेश जाधव, हरिष राणे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान ‘अवनि’ व एकटी संस्थेने निर्माल्य संकलन करून त्याचे वर्गीकरण केले.