

कोल्हापूर : मुदत ठेव आणि म्युच्युअल फंडातून जादा परताव्याचे आमिष दाखवून उद्योजक, व्यावसायिकांसह 12 बड्या गुंतवणूकदारांची 96 लाख 60 हजार 18 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या क्रशर चौक आणि शिरोली एमआयडीसी शाखेचा निलंबित व्यवस्थापक विकास अण्णाप्पा माळी (वय 38, रा. जरगनगर, कोल्हापूर, मूळ गाव केंपवाड, ता. अथणी, बेळगाव) याला जुना राजवाडा पोलिसानी मंगळवारी पहाटे बेड्या ठोकल्या.
फसगत झालेल्या बँक ग्राहकांचे लाखो रुपये संशयित विकास माळी याने चार मित्रांच्या खात्यावर परस्पर वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकारही चौकशीत उघडकीला आला आहे. चौकशीत मित्रांचा सहभाग निष्पन्न झाल्यास कायदेशीर कारवाईबाबत निर्णय होईल, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
देशभर जाळे पसरलेल्या आणि नामांकित बँकेच्या कोल्हापूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्यवस्थापकानेच गुंतवणूकदारांना एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. फसवणुकीचा प्रकार चव्हाट्यावर येताच आयसीआयसीआय बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या घटनेची दखल घेत व्यवस्थापक विकास माळी याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
आयसीआयसीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी गजानन सदाशिव गायकवाड (वय 44, रा. कुपवाड रोड, सांगली) यांनी संशयित बँक व्यवस्थापक विकास माळी याच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. जुलै 2022 ते डिसेंबर 2024 या काळात हा प्रकार घडला. फसवणुकीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संजीव झाडे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संदीप गळवे यांनी पहाटे छापेमारी करून संशयिताला ताब्यात घेतले.
गुंतवणूकदारांसह उद्योग-व्यावसायिक व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यवस्थापकावर विश्वास ठेवून गुंतवलेली 96 लाख 60 हजार 18 रुपयांची रक्कम संशयित माळी याने त्याच्या ओळखीचे अवधूत रमेश पाटील, शिवानी अवधूत पाटील, सुधीर मारुती शिरगुप्पे यांच्या खात्यावर ट्रान्स्फर करून ती रक्कम आपल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा अथणी (जि. बेळगाव) या बँकेतील खात्यावर ट्रान्स्फर केली आहे. तेथून ही रक्कम संशयिताने त्याच्या झिरोधा ब—ोकिंग प्रा. लि. कंपनीच्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बँक ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासार्हतेला तडा देऊन व्यवस्थापक माळी याने फसवणुकीचा गंभीर गुन्हा केला आहे. या प्रकरणात त्याच्या आणखी काही साथीदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सखोल चौकशी करून अन्य संशयितांचा छडा लावण्यात येईल, असे तपासाधिकारी संजीव झाडे यांनी सांगितले.
संशयित विकास माळी याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे यांनी सांगितले. या गुन्ह्यात अन्य संशयितांचा सहभाग लवकरच निष्पन्न होईल. त्यांच्यावरही अटकेची कारवाई शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखा व्यवस्थापक विकास माळी याच्या कारनाम्याने गुंतवणूकदार, ग्राहक अनुक्रमे तेजोमय हॉस्पिटल - डॉ. महेश दळवी (48 लाख), स्नेहा भोसले (17 लाख 50 हजार), श्रद्धा भोसले (5 लाख), मानवेंद्रनाथ जोशी (7 लाख 50 हजार), प्रकाश जगदाळे (5 लाख), आरती भावे (4 लाख), रवी गुडस् ट्रान्स्पोर्ट - रवींद्र भावे (1 लाख 50 हजार), उद्धव इंगळे (3 लाख 10 हजार 18 रुपये), गजानन सावंत (1 लाख), विशाल सोनवणे (1 लाख), संतोष पठारे (50 हजार), न्यू मॅटिक सेल्स अँड प्रा. लि. सर्व्हिसेस - नितीन शिंदे (2 लाख 50 हजार) यांना आर्थिक दणका सोसावा लागला आहे.