

Bambavde Bajar Peth Sellers Losses
बांबवडे : बांबवडे (ता. शाहुवाडी) परिसरात सलग तीन दिवस वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी भर आठवडी बाजाराच्या वेळी दुपारी सुमारे तीन वाजता अचानक कोसळलेल्या पावसामुळे व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. त्यामुळे आठवडी बाजार पूर्णतः विस्कळीत झाला.
सुमारे तासभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाजीपाला विक्रेत्यांचा माल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले. सलग पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठाही खंडित होत असून वारंवार लपंडाव सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात वीजेच्या या समस्येमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बांबवडे व परिसरात दररोज वळीव पावसाची हजेरी लागत आहे. या पावसामुळे उस पिकाला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असली, तरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आणि मका पिकांची काढणी विस्कळीत झाली असून नुकसानही होत आहे. सततच्या पावसामुळे शेतीची कामेही ठप्प झाली आहेत.