

कोल्हापूर : कोवाड (ता. चंदगड) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडून त्यामधील 18 लाख 77 हजार रुपये लुटणार्या टोळीसंबंधात स्थानिक गुन्हे अन्वेषण व चंदगड पोलिसांच्या हाती सोमवारी महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. पोलिसांची तीन शोध पथके राजस्थानमधील भरतपूर व मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. चौकशीत टोळीच्या म्होरक्यासह तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, तपासाच्या द़ृष्टीने गोपनीयता पाळण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी भरतपूर जिल्हा पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला आहे.
दरम्यान, एटीएम सेंटर फोडून लाखो रुपये लुटणार्या टोळीविरुद्ध नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशसह काही राज्यांत 8 गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचेही वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले. लुटारू टोळीच्या ताब्यातील मोटार व एक मोबाईलही पोलिसांच्या हाती लागला आहे. संबंधित मोबाईलचे कॉल डिटेल्सही मागवण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळपर्यंतही माहिती तपास पथकाच्या हाती येईल, असेही सांगण्यात आले.
वरिष्ठ सूत्राच्या माहितीनुसार, राजस्थानातील कुख्यात टोळीने कोवाडसह चंदगड तालुक्यात किमान दोन ते तीन दिवस रेकी करून लुटीचा प्लॅन केला असावा, अशी माहिती आहे. शिवाय, परिसराची आणि कोवाड येथील संबंधित एटीएम सेंटरच्या उलाढालीची माहिती असणारा जिल्ह्यातील स्थानिक टिप्सरचा टोळीत सहभाग असावा, असा संशय आहे. म्होरक्यासह सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची यंत्रणा गतिमान झाली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकार्यांचा कोवाड परिसरात तळ पडला आहे.
टोळीच्या म्होरक्यासह संशयितांच्या कारनाम्यांचीही माहिती भरतपूर पोलिसांकडून मागविण्यात येत असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून रात्री उशिरा सांगण्यात आले. येत्या तीन-चार दिवसांत कुख्यात टोळीतील साथीदारांना बेड्या ठोकण्यात यश येईल, असाही विश्वास वरिष्ठ अधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.