कोल्हापूर ः विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि. 23) होत आहे. अतिशय चुरशीने आणि ईर्ष्येने झालेल्या या निवडणुकीचा महाफैसला आता काही तासांवर आला आहे. लोकांची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली आहे की, अक्षरशः कोट्यवधी रुपयांच्या पैजा या निवडणुकीवर लागल्या आहेत. जिल्ह्यात मातब्बरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ही निवडणूक असल्याचे मानले जात आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार शिंदे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत स्वतंत्र उमेदवार राजेश लाटकर यांच्यात चुरस आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे चिन्ह मतदान यंत्रावर आले नाही. काँग्रेसने ऐनवेळी लाटकर यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
कोल्हापूर दक्षिणमध्ये पाटील-महाडिक घराण्यांचा पारंपरिक संघर्ष पुन्हा होत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात संघर्ष आहे. या दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. करवीरमध्ये महायुतीतच बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून, त्यांच्याविरोधात या मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केलेले चंद्रदीप नरके शिवसेना शिंदे गटामार्फत लढत आहेत. येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संताजी घोरपडे यांनी बंडखोरी केली असून, त्यांना झालेल्या मारहाणीने निवडणुकीला गालबोट लागले आहे.
कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे असा पारंपरिक सामना आहे. 1999 पासून सातत्याने या मतदारसंघातून निवडून येणारे हसन मुश्रीफ पुन्हा मतदारांचा कौल आजमावत आहेत. गेल्या वेळचे त्यांचे प्रतिस्पर्धी समरजित घाटगे हे त्यांच्याविरोधात मैदानात आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही उमेदवार आपापले मूळ पक्ष सोडून अन्य पक्षांतून लढत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. राधानगरीत विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाचे के. पी. पाटील यांच्याशी आहे. आबिटकर सलग दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. राज्यातील सत्तांतरात आबिटकर यांनी शिंदे शिवसेनेला साथ दिली. आता बदललेल्या भूमिकेतून त्यांची लढत ठाकरे शिवसेनेकडून लढणार्या पाटील यांच्याशी होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
चंदगडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याने मतदारांचा कौल कोणाला, याची चर्चा आहे. महायुती अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे, तर महाविकास आघाडीच्या नंदाताई बाभुळकर यांच्याविरोधात काँग्रेसचे विनायक पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्याशिवाय जनसुराज्य पक्षाचे मानसिंग खोराटे हेसुद्धा मैदानात उतरल्याने उमेदवारांची मांदियाळी झाली आहे.
इचलकरंजीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना आहे. भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्या लढतीत मतदारांनी कौल कोणाला दिला, हे शनिवारी स्पष्ट होईल.शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक पुन्हा मतदारांचा कौल आजमावत असून, त्यांची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्यजित पाटील-सरूडकर यांच्याशी होत आहे.
हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत आहे. येथे विद्यमान आमदार काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध महायुती पुरस्कृत जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्याशी होत आहे.शिरोळमध्येही तिहेरी सामना होत असून, विद्यमान आमदार महायुती पुरस्कृत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात काँग्रेसचे गणपतराव पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यात लढत होत आहे.
उत्सुकता ताणल्या गेलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे लोक डोळे लावून बसले आहेत. पक्षातील फाटाफूट, बदललेली राजकीय समीकरणे, नेत्यांच्या बदललेल्या भूमिका आणि बंडखोरीची लागण, यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला असून, आता कौल कोणाला, हे काही तासांतच समजणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.