प्रचंड संघर्ष, ईर्षा यामुळेच कोल्हापूर मतदानात भारी

Maharashtra Assembly Polls | केवळ दोनच मतदारसंघांत 70 टक्क्यांपेक्षा कमी मतदान
Kolhapur Assembly Election
कोल्हापूर विधानसभा निवडणूकFile Photo
Published on: 
Updated on: 
विकास कांबळे, कोल्हापूर

मतदानामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात भरारी घेतले आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अतिशय चुरशीच्या लढती असलेल्या मतदारसंघांत अधिक मतदान झाले आहे. करवीर तालुक्यात तर राज्यात सर्वाधिक म्हणजे 84.79 टक्के मतदान झाले आहे. यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीतील चुरस पाहायवास मिळते. काही मतदारसंघांत उमेदवारांचे अस्तित्व टिकविणारी, तर काही मतदारसंघांत आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी यंदाची लढत रंगली. उमेदवारांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. नेत्यांमध्ये सुरू असलेली टोकाची ईर्षा कार्यकर्त्यांमध्येही उतरली. त्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. मतदान केंद्रापर्यंत मतदारांना नेण्याचे केलेले नियोजन आणि त्यात आलेले यश यामुळेच कोल्हापुरातील मतदानाचा टक्का वाढला आहे.

  1. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघांत टोकाची चुरस आणि प्रचंड ईर्षा दिसून आली. काही मतदारसंघांतील लढाया तर अस्तित्वाच्या लढाया ठरल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपले सर्वस्व पणाला लावले नसते, तरच नवल होते. आता नाही तर कधी नाही, अशी स्थिती काही मतदारसंघांतील उमेदवारांची झाल्यामुळे त्यांनी मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांच्या ‘डिमांड’ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

  2. करवीर तालुक्यातील काँग्रेसचे राहुल पी. एन. पाटील व शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्यात लढत आहे. पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे त्यांचे चिरंजीव राहुल यांना ‘साहेबांच्या माघारी, आपली जबाबदारी’ असे म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. नरके यांना पराभवाचा डाग पुसून काढायचा आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेदेखील यावेळी ईर्षेने मैदानात उतरले असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.

  3. संपूर्ण राज्याचे कागल विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ सातव्यांदा निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी तगडे आव्हान दिले. मुश्रीफ यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांनी दोन, तीन तालुक्यांतील गावांचा समावेश असलेल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या दारात पोहोचण्याचा प्रयत्न केला. साहजिकच, या मतदारसंघात 81.79 टक्के मतदान झाले. शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचे आ. विनय कोरे व शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यात पारंपरिक लढतीचे चित्र राहिले. या मतदारसंघात 79.4 टक्के मतदान झालेे. आ. कोरे यांच्या द़ृष्टीने ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते.

  4. शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक चुरशीच्या बनलेल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातदेखील मतदानाचा टक्का वाढला आहे. या मतदारसंघात हॅट्ट्रिकवर असणारे आ. प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात लढत आहे. याशिवाय अपक्ष म्हणून ए. वाय. पाटील निवडणूक रिंगणात असल्यामुळे या मतदारसंघतील मतदानाची टक्केवारी 78.26 इतकी राहिली आहे. शिरोळमध्ये माजी मंत्री आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व गणपतराव पाटील यांच्या प्रतिष्ठेची लढत आहे. याशिवाय या मतदारसंघात तिसर्‍या आघाडीकडून माजी आमदार उल्हास पाटीलदेखील निवडणूक रिंगणात असल्यामुळे मतदानाची टक्केवारी चांगली म्हणजे 78.6 इतकी राहिली आहे. हातकंणगले विधानसभा मतदारसंघातदेखील बहुरंगी लढत आहे. महाविकास आघाडीकडून आ. राजुबाबा आवळे, महायुतीकडून डॉ. अशोकराव माने व तिसर्‍या आघाडीकडून डॉ. सुजित मिणचेकर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे सर्वांनीच जास्तीत जास्त मतदान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

  5. कोल्हापूर दक्षिणमधील सामनादेखील हायव्होल्टेज आहे. यामध्ये आ. ऋतुराज पाटील व माजी आ. अमल महाडिक यांच्यात लढत दिसली, तरी सामना काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व भाजपचे नेते खासदार धनंयज महाडिक यांच्यातच रंगला. दोन्ही गटांकडूनही मोठ्या प्रमाणात मतदान बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे सुमारे 75 टक्के मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मात्र अपेक्षेपेक्षा कमी 65.51 इतके मतदान झाले.

केवळ दोनच मतदारसंघांत 70 टक्क्यांपेक्षा कमी मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघांमध्ये 70 टक्क्यांवर मतदानाची आकडेवारी गेली आहे. यामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मतदारसंघांचा समावेश आहे. केवळ दोनच मतदारसंघांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news