

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आता तपासणी अहवाल असलेल्या गुळांचेच सौदे निघणार आहेत. समितीमध्ये बुधवारी समिती प्रशासन, व्यापारी, गूळ उत्पादक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. निर्णयावर सर्वांचे एकमत झाले; मात्र बुधवारी समितीमध्ये गूळ सौदे निघाले नाहीत.
गुजारातमधील काही गूळ व्यापारी असोसिएशनने कोल्हापूरमधील गूळ खरेदी बंद केली आहे. त्यामुळे गूळ उत्पादकांनी सोमवार, मंगळवार गूळ उत्पादनच बंद ठेवले होते. दोन दिवसांच्या बंदनंतर बुधवारी (दि.15) समितीमध्ये वीस गाड्या गुळाची आवक झाली; मात्र व्यापार्यांनी गूळ खरेदी न करण्याची भूमिका घेतल्याने सौदे निघाले नाहीत. सौदे न निघाल्याने गूळ उत्पादक आक्रमक झाले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.
यानंतर समितीमध्ये सभापती नानासो कांबळे यांच्या उपस्थितीत गूळ उत्पादक, व्यापारी, समितीचे अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीमध्ये सभापती कांबळे यांनी गूळ खरेदी का केली नाही, अशी विचारणा व्यापार्यांना केली. यावर व्यापार्यांनी गुजरातमधील गूळ व्यापारी असोसिएशनने कारवाई होईल, गूळ जप्त होईल अशा दर्जाच्या गुळाचा पुरवठा न करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे गूळ खरेदी न केल्याचे सांगितले. यावर गूळ उत्पादकांनी आज आणलेला गूळ व्यापार्यांनी खरेदी करावा, अशी मागणी केली. ही मागणी व्यापार्यांनी मान्य केली. समितीमध्ये बुधवारी आलेल्या गुळाचे आज सौदे निघणार आहेत. बैठकीला समितीचे सचिव धनाजी दळवी, नरेश पटेल, राजू पटेल, निमेश वेद आदींसह अन्य व्यापारी, गूळ उत्पादक उपस्थित होते.
गुरुवारनंतर समितीमध्ये येणार्या गुळासोबत त्याचा टेस्टिंग रिपोर्ट असणे आवश्यक असल्याचे समिती व व्यापार्यांनी गूळ उत्पादकांना सांगितले. त्याला गूळ उत्पादकांनी सहमती दर्शविली. तपासणी अहवाल असलेल्या गुळाचीच खरेदी करण्याच्या भूमिकेवर व्यापार्यांनीही ठाम राहावे, असे गूळ उत्पादकांनी सांगितले.