Kolhapur News | धक्कादायक अंबप येथे विषबाधेने मृत्यूमुखी पडलेल्या मेंढ्या मटणविक्रीसाठी?
कासारवाडी: अंबप (ता . हातकणंगले) येथे मेंढ्यांना विषबाधेने तब्बल वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला. मेलेल्या मेंढ्या या काही जणांनी मटन विक्रीसाठी परस्पर नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
वडगाव पोलिसांनी घेतली दखल!
सकाळी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने काहीजणांनी या मेंढ्या परस्पर मटन विक्रीसाठी विकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती वडगाव पोलिसांना लागताच त्यांनी संबंधितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अंबप गावच्या पश्चिमेस इंडस्ट्रियल पार्कच्या माळावर अंबप येथील मेंढपाळ सतीश सर्जेराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसापासून चरत होत्या. बुधवारी दिवसभर या परिसरात चरल्यानंतर सायंकाळी शेतकरी अशोक नाना माने यांच्या शेतात बसवण्यासाठी होत्या गुरुवारी सकाळी पासून मेंढ्यांचे पोट फुगू लागल्यामुळे सतीश हिरवे यांनी गावातील स्थानिक डॉक्टर यांना बोलवले व उपचार सुरू केले पण काही वेळेतच 5 मेंढ्याचा मृत्यू झाला सकाळी 11 नंतर याची माहिती मिळताच स्थानिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवले, परंतु तोपर्यंत अनेक मेंढ्या दगावल्या होत्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाकीच्या मेंढ्यांना तात्काळ उपचार करत चाळीसवर मेंढ्या वाचवल्या. दुपारी सरपंच दिप्ती माने, उपसरपंच असिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, ग्रा पं सदस्य सारिका हिरवे, अजित माने,तलाठी उमेश माळी यांनी या घटनेची माहिती घेतली.
सायं 5 च्या दरम्यान मयत 20 मेंढयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ प्रवीण नाईक, डॉ यशोदीप कांबळे, पशुधन पर्यवेक्षक डॉ आरती दांडगे , डॉ रजनीकांत अवताडे, डॉ स्वरूप चाळके, डॉ आर्यरत्न कांबळे यांनी पोस्टमार्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

