Kolhapur News | अंबपमध्ये ऊसतोड मजुरांच्या ९ चिमुकल्यांसह गर्भवती महिलेला विषबाधा!

‘येरमुंगळी’च्या बिया खाल्ल्याने प्रकृती बिघडली; तीन रुग्णवाहिकांतून सर्वांना कोल्हापूरला हलविले
Kolhapur News | अंबपमध्ये ऊसतोड मजुरांच्या ९ चिमुकल्यांसह गर्भवती महिलेला विषबाधा!
Kolhapur News | अंबपमध्ये ऊसतोड मजुरांच्या ९ चिमुकल्यांसह गर्भवती महिलेला विषबाधा!
Published on: 
Updated on: 

कासारवाडी ; हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे ऊसतोड सुरू असलेल्या शेतात विषबाधेची गंभीर घटना घडली. बीड जिल्ह्यातून ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या टोळीतील चिमुकल्यांसह गर्भवती महिलेला येरमुंगळीच्या झाडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली. अचानक उलट्या, चक्कर आणि मळमळ सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सर्व बाधितांना प्रथम अंबप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबप येथील आशिष पाटील यांच्या शेतात बीड जिल्ह्यातून आलेली रणजीत चिबडे यांची ऊसतोड मजुरांची टोळी काम करीत आहे. टोळीतील सर्वजण ऊसतोडीसाठी शेतात गेल्यानंतर काही मुले आणि महिला शेताच्या परिसरात होत्या. यावेळी राजश्री मिरसागर (वय ११), आकाश खरात (वय ४), आराधना खरात (वय ३), रमजान भानू शेख कलीम (वय ५), इब्राहिम शेख कलीम (वय ९), शेख रहीम शेख कलीम (वय ८), फातमा भानू शेख कलीम (वय ३), बानो भानू शेख कलीम (वय १०), शबनम शेख (वय २२), आरती आकाश खरात (वय २०, गर्भवती) आणि आशिष आकाश खरात (वय ३) यांनी येरमुंगळीच्या झाडाच्या बिया खाल्ल्या.

बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच संबंधितांना चक्कर येणे, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. ही बाब ऊसतोड मजुरांसह शेतमालक आशिष पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ सर्वांना अंबप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले.

दरम्यान, घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. विकासराव माने, राजेंद्र माने आणि ग्रामपंचायत सदस्य असिफ मुल्ला यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पुढाकार घेतला. प्रशासकीय व खासगी यंत्रणेच्या माध्यमातून १०८ क्रमांकाच्या दोन आणि नाणीज मठाची एक अशा एकूण तीन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सर्व बाधितांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

या आपत्कालीन परिस्थितीत डॉ. माहेश्वरी नामदेव उमरजकर कुंभार, प्रियांका तिवडे, मनीषा घाटगे, ज्ञानेश्वर नागरगोजे, तेजस्विनी सावर्डेकर, सुहास माळी, तानाजी यादव तसेच आरोग्य सेवकांनी उपचार व मदतकार्यात सहकार्य केले.

एकाच वेळी अनेक चिमुकल्यांसह गर्भवती महिलेला विषबाधा झाल्याने अंबप परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळेत वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था झाल्याने बाधितांना पुढील उपचारासाठी तातडीने हलविणे शक्य झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.