Ambabai Temple : मंदिर संवर्धन कामातील गोंधळ रोखण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे!

अंबाबाई हक्कदार पुजार्‍यांनी वेधले लक्ष, साडेतीन महिने प्राकार देवतांची नित्यपूजा कलशावरच
Kolhapur Ambabai temple
Kolhapur Ambabai temple |
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये पुरातत्त्व खात्याच्या वतीने सुरू असलेल्या मंदिर संवर्धनाच्या कार्यपद्धतीवरून वाद निर्माण झाला असतानाच आता संवर्धन प्रक्रियेत धार्मिक परंपरा, पुरातत्त्वीय निकष व तांत्रिक शिस्त पाळली जात नसल्याची थेट तक्रार मंदिरातील हक्कदार पुजारी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यामध्ये संबंधित कामे करताना धर्मशास्त्राप्रमाणे गणपती मंदिराचे शिखर काम करताना ‘तत्त्वचालन विधी’ केला नाही. शिवाय, १४ मार्च रोजी अंबाबाईच्या मूळ मूर्तीसह ५ शिखरे आणि १४ प्राकार देवतांचे तत्त्वचालन जरी करण्यात आले असले, तरी या कामाला झालेल्या विलंबामुळे झाकून ठेवलेल्या देवतांच्या मूर्ती न उघडल्याने भाविकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाविक परस्पर मूर्तीवरील आच्छादने बाजूला करून मूर्तीला गंध लावणे, प्रसाद ठेवणे असे प्रकार करू लागले आहेत. या कामास अधिक कालावधी लागला, तर भाविकांमध्ये असंतोष पसरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अंबाबाई मंदिर संवर्धन कामांतर्गत फेब्रुवारी २०२६ मध्ये हे काम दिलेल्या कंत्राटदाराने मंदिराचे बाह्य भागावर सँड ब्लास्टिंग प्रक्रिया सुरू केली. त्याबरोबरच मंदिर शिखरावरील कोबा व टाईल्स काढून टाकल्या. पाच शिखरांचे मूळ स्वरूप कळण्याच्या हेतूने श्री गणपती मंदिराच्या शिखरावरील रंग, चुना, गिलावा काढून टाकण्यास सुरवात केली. वस्तुतः मंदिराच्या कोणत्याही भागाचे संवर्धन वा अन्य प्रकारचे काम, ज्यामध्ये हत्यारांचा वापर केला जाणार आहे, अशा ठिकाणी तत्त्वचालन हा विधी केल्याशिवाय कामाला प्रारंभ करावयाचा नाही, असे धार्मिक संकेत आहेत. परंतु, गणपती मंदिराचे शिखर काम करताना हक्कदार पुजार्‍यांना कोणतीही कल्पना दिली नाही आणि तत्त्वचालनाशिवाय काम सुरू केल्याचे पुजारी मंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अशा कामांमुळेच मंदिरात बर्‍याच ठिकाणी गळती लागली आणि याबाबत अधिकार्‍यांना विचारणा केल्यास समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मंदिराच्या गर्भगृहातील बांधकामही अपुरे आहे. दि. १४ ते १८ मार्च या दरम्यान मुख्य गर्भगृहातील सँड ब्लास्टिंगचे काम दगडी भिंतीतील दर्जा भरण्यासह पूर्ण करण्याचे ठरले होते व जमिनीवर घातलेली फरशी बदलून तेथे दगडी फरशी बसवून देण्याचे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात फरशी काढून टाकली, तिथे दगडी फरशी घालण्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. आतील फरशी काढून टाकल्यामुळे जमीन खाली गेली आहे. त्यामुळे आतील हालचालींवर प्रचंड मर्यादा येत आहेत. देवीचे शेजघर, पाणी साठविण्याची खोली, साहित्याची खोली यांचा वापरच करता येत नाही. याचा स्वाभाविक परिणाम धार्मिक विधीवर होतो आहे.

एक नवा सावळा गोंधळ समोर...

सर्वांत गंभीर बाब म्हणजे अंबाबाई मंदिर संवर्धन कार्यक्रमात नियमित पूजेत असलेल्या १४ प्राकार देवतांपैकी १२ प्राकार देवतांना जागेवरून बाजूला करूनच संवर्धन करावे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे १४ मार्च रोजी श्री अंबाबाईची मूळ मूर्ती, श्री सरस्वती, श्री महाकाली, श्री गणपती या देवतांसह पाच शिखरे आणि १४ प्राकार देवतांचे तत्त्वचालन करण्यात आले. हे सर्व तत्त्वकलश एकत्रित ठेवण्यात आले आहे. श्री अंबाबाई व गणपती वगळता या सर्व देवतांची नित्य पूजा प्रतीकात्मक स्वरूपात कलशावर करण्यात येत आहे आणि प्राकार देवतांच्या संवर्धनाच्या कामाविषयी ठेकेदारासोबत चर्चा केली असता प्राकार देवता संवर्धन हा विषयच मूळ कामात नसल्याचे उघडकीस आल्यामुळे मंदिरातील एक नवा सावळा गोंधळ समोर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news