

कोल्हापूर : ‘आदिमाया अंबाबाई... साऱ्या दुनियेची आई’, ‘उदं गं अंबे उदं’, ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ अशा गजरात नवरात्रौत्सवातील तिसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा पालखी प्रदक्षिणा सोहळा भाविकांच्या साक्षीने उत्साहात पार पडला.
फुलांनी मढवलेल्या दोन हत्तींच्या आकारातील पालखीतून अंबाबाईच्या उत्सवमूर्तीवर पालखी सोहळ्यात पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले. मानाच्या भाविणींनी अंबाबाईचे गौरवगीत गायले. पालखीसोहळ्यानंतर आतषबाजीच्या रोषणाईने आसमंत उजळले. गेल्या काही वर्षांपासून पालखी सोहळ्यादरम्यान काही हुल्लडबाज तरुण ‘इकडे बघा नारायणी, तिकडे बघा नारायणी’ असे ओरडत असतात. यंदा अशा तरुणांचा आवाज पोलिसी खाक्या दाखवत बंद करण्यात आला. मंगळवारीही ‘नारायणी नारायणी’चा घोष करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलेच फैलावर घेतले.